!-- afp header code starts here --> कष्टकऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांचा गौरवपूर्ण सत्कार

कष्टकऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांचा गौरवपूर्ण सत्कार

 


कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मांडले असंघटित कामगारांचे प्रश्न

महापालिकेतील ‘खुर्चीला चिकटलेल्या’ भ्रष्ट अधिकाऱ्यांची उचलबांगडी करा; महापौरांकडे ठाम मागणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवनिर्वाचित महापौर श्री. रवी लांडगे यांनी पदभार स्वीकारताच जनसंपर्काचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर, कष्टकऱ्यांचे नेते आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौरांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी महापौरांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन कष्टकऱ्यांच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान केवळ सत्कारच नव्हे, तर शहरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर आणि महापालिकेतील प्रशासकीय अनागोंदीवर सविस्तर व गंभीर चर्चा करण्यात आली.

असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी एल्गार

चर्चेदरम्यान डॉ. बाबा कांबळे यांनी शहरातील विविध घटकांच्या समस्या ठळकपणे मांडल्या. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

रिक्षा-टॅक्सी चालक: वाढती महागाई आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत परवाने व हक्काचे रिक्षा स्टँड (थांबे) उपलब्ध करून द्यावेत.

टपरी, पथारी व हातगाडीधारक: अन्यायकारक जप्ती कारवाया थांबवून फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी व सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे.

घरकामगार व बांधकाम मजूर: महिला घरकामगार व बांधकाम कामगारांना सुरक्षा, आरोग्य विमा व शासकीय कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी महापालिकेने विशेष यंत्रणा उभी करावी.

स्वच्छता कर्मचारी व हमाल: ‘समान काम-समान वेतन’ या तत्त्वानुसार थकीत वेतन त्वरित अदा करावे व कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

भ्रष्ट अधिकारी आणि ‘खुर्चीला चिकटलेली’ यंत्रणा

डॉ. कांबळे यांनी महापालिकेतील प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, गेल्या काही वर्षांत प्रशासकीय राजवटीचा गैरफायदा घेत काही अधिकाऱ्यांनी महापालिकेला स्वतःची जहागीर समजले आहे. अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत असून त्यामुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे घट्ट झाली आहेत व सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत आहेत.

महापौरांनी यापूर्वीच अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची बाब शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. बदल्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

डॉ. बाबा कांबळे यांचा इशारा

“प्रशासकीय राजवटीचा गैरफायदा घेत काही अधिकाऱ्यांनी कष्टकऱ्यांच्या हिताच्या योजना धुळीस मिळवल्या आहेत. महापौरांनी दिलेले बदली आदेश तात्काळ राबवले नाहीत, तर हजारो कष्टकरी महापालिकेवर धडक देऊन तीव्र आंदोलन करतील.”

महापौरांचे आश्वासन

शिष्टमंडळाच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले:

“मी स्वतः सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहे. कष्टकऱ्यांच्या वेदना मला ठाऊक आहेत. महापालिकेत पारदर्शकता आणणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश झाले आहेत, त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांना कडक सूचना देण्यात येतील. कष्टकऱ्यांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”

या शिष्टमंडळात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे पदाधिकारी, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने