!-- afp header code starts here --> धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर; धर्मरक्षणाबाबत हिंदू समाज बेसावध – डॉ. गौतम खट्टर

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर; धर्मरक्षणाबाबत हिंदू समाज बेसावध – डॉ. गौतम खट्टर

 


‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२६’ उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : हिंदू समाज अज्ञान व बेसावधपणामुळे धर्मरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. या दुर्लक्षातून होणारे मतांतर अखेरीस राष्ट्रांतरास कारणीभूत ठरते, असे ठाम प्रतिपादन डॉ. गौतम खट्टर यांनी येथे केले.

 स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२६’ सोहळा ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे गुरुवारी (दि. २६) दिमाखात पार पडला.

प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. खट्टर यांनी राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा अभेद्य समन्वय साधणारे राष्ट्र हीच विनायक दामोदर सावरकर यांची राष्ट्रकल्पना असल्याचे अधोरेखित केले. “धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर” हा सावरकरांचा परखड विचार आजही तितकाच वास्तव व संदर्भास्पद असल्याचे सांगत त्यांनी संघटित धर्मजागरण, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक आत्मभान यांची आवश्यकता व्यक्त केली.

गेल्या १७ वर्षांपासून राष्ट्रनिष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. यंदा नलगोंडा (तेलंगणा) येथील रामावत नर्यानाईक यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, तर अकोला येथील गजानन सोलकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.

रामावत नर्यानाईक यांनी नलगोंडा जिल्ह्यात सात हजारांहून अधिक धर्मांतरित हिंदूंची ‘घरवापसी’ घडवून आणल्याची माहिती देण्यात आली. गोरमाटी भाषेत व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांनी अंधश्रद्धा व अज्ञानामुळे ‘धर्मांतर’ नव्हे, तर ‘मतांतर’ घडते; ‘मतांतर’ ही संज्ञा अधिक अचूक असल्याचे मत व्यक्त केले. गजानन सोलकर यांनी अकोला जिल्ह्यातील ५३ पैकी ४१ गावांत घरवापसीचे कार्य केल्याचे सांगितले. सावरकरांच्या नावाने मिळालेला सन्मान ही मोठी प्रेरणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, ग्रंथपूजन व शस्त्रपूजनाने झाली. सचिव ॲड. हर्षदा पोरे यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. शैलेश भिडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. नारायण देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. ध्वनिचित्रफितीद्वारे पुरस्कारार्थींच्या कार्याचा परिचय सादर करण्यात आला. विराज सवाई यांनी सूत्रसंचालन केले.

 तर शुभांगी डोंगरे यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

सोहळ्यास सावरकरप्रेमी,अध्यक्ष विजय शंकर कर्ता व कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 विविध क्षेत्रांतील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने