गुढीपाडवा शोभायात्रेत हिंदू एकतेचा भव्य जल्लोष

 


पिंपरी-चिंचवड : हिंदू एकता समिती, छत्रपती शिवाजी पार्क, महात्मा फुले नगर व जिजामाता पार्क यांच्या वतीने आयोजित हिंदू नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रा २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. संपूर्ण परिसर भगवामय झाला असून नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा विशेष आकर्षण ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश मंदिरात मंगलमय आरतीने झाली. नगरसेवक निलेश दादा नेवाळे, कुंदन दादा गायकवाड, योगिता ताई नागरगोजे व रिटा ताई सानप यांच्या हस्ते आरती संपन्न होऊन शोभायात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर श्रीरामांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील पारंपरिक हलगी वादन पथकाने आपल्या दमदार सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले. हलगीच्या ठेक्यावर नागरिकांनी उत्स्फूर्त नृत्य करत हिंदू संस्कृतीचा जल्लोष साजरा केला.

शोभायात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी माता-भगिनींनी रांगोळ्या काढून व श्रीरामांच्या पालखीला पंचारती ओवाळून भक्तिभावाने स्वागत केले. छत्रपती


शिवाजी पार्क, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री तुळजा माता मंदिर, श्री नागेश्वर मंदिर व जिजामाता पार्क या मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली.

या सोहळ्यात महिला वर्गाचा विशेष सहभाग दिसून आला. भगवे उपरणे, भगवी टोपी व भगवा झेंडा हातात घेत नागरिकांनी एकतेचा संदेश दिला.


समारोपप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हाप्रमुख नरेंद्रजी पेडसे यांनी ‘पंचपरिवर्तन’ विषयावर मार्गदर्शन करत हिंदू एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचा प्रस्ताव शिवानंद चौगुले यांनी मांडला, तर आभार प्रदर्शन श्रीराम कुलकर्णी यांनी केले. पसायदान व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमात विविध मंदिर संस्थांचे प्रतिनिधी, चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच सोलापूर येथील हलगी पथकाचा सन्मान करण्यात आला. तसेच दीपक साळुंखे व अतुल काळोखे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

ही शोभायात्रा हिंदू संस्कृती, परंपरा आणि एकतेचा प्रभावी संदेश देणारी ठरली.

थोडे नवीन जरा जुने