तेहरान : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी आपल्या पहिल्या संदेशात प्रदेशातील सर्व अमेरिकन लष्करी तळ तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.
दूरचित्रवाणीवरून दिलेल्या संदेशात मोजतबा खामेनेई यांनी सांगितले की, इराणच्या शत्रूंवर दबाव आणण्यासाठी हॉर्मूझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुढेही बंद ठेवली जाईल. तसेच तेहरान आपल्या शत्रूंंकडून नुकसानभरपाईची मागणी करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी देशातील जनतेला एकतेचे आवाहन करत कुद्स डे (Quds Day) निमित्त मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “युद्धात मारल्या गेलेल्या इराणी नागरिकांचा बदला घेतला जाईल,” असेही खामेनेई यांनी आपल्या भाषणात म्हटले.
“आपला देश सध्या प्रचंड दबाव आणि हल्ल्यांना सामोरे जात असताना शूर लढवय्ये ज्या धैर्याने काम करत आहेत, त्यांचे मी आभार मानतो,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने टेलिग्राम संदेशात सांगितले की, हा धोरणात्मक संदेश सात महत्त्वाच्या भागांत जारी करण्यात आला असून त्यात क्रांतीच्या शहीद नेत्याबद्दल, जनतेची भूमिका आणि कर्तव्ये, सशस्त्र दल, कार्यकारी यंत्रणा, प्रतिकार मोर्चा तसेच प्रदेशातील देश आणि शत्रूंना तोंड देण्याबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
