पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) - येथील रामकृष्ण मोरे सभागृह शेजारील प्रेम सागर अपार्टमेंटच्या जवळ फूटपाथवर असलेले चेंबर तुटलेले असून ते अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावर लाईट नसतो. तसेच प्रेम सागर अपार्टमेंटच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी नागरिक याच फूटपाथचा वापर करतात.
यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अपघात होण्याची शक्यता आहे. जर कोणी चुकून या तुटलेल्या चेंबरवरून गेले तर पडून त्याचा पाय तुटण्यासारखी गंभीर दुखापत होऊ शकते.
शहरासह उपनगरातील फुटपाथांची झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. उखडलेल्या फरशा, उघडी चेंबर, व्यावसायिकांचे अतिक्रमण, स्टॉल व पार्किंगसाठी वापर होत असल्यामुळे फुटपाथांचा मूळ हेतूच हरवला आहे. यामुळे या फुटपाथवरून चालायचे कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ‘लाखोंचा खर्च करूनही फुटपाथ बिनकामाचे’ अशी स्थिती झाली आहे. पावसाळ्यापूर्वी फुटपाथ वरील चेंबरची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सेफ्टी ऑडिट करून ती तातडीने दुरुस्त करावीत, अशी नागरिकांची आयुक्त साहेबाना विनंती आहे.
म्हणून सदर धोकादायक चेंबरची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी, ही नम्र विनंती.
