राष्ट्र सेवा दलाला स्वातंत्र्यलढ्यापासून सामाजिक परिवर्तनापर्यंतचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. साने गुरुजींच्या विचारांतून आणि संघर्षातून उभे राहिलेले हे संघटन लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि समतेच्या मूल्यांशी बांधील आहे. मात्र, या संघटनेचा वापर विशिष्ट राजकीय स्वार्थासाठी करून तिला सनातनी विचारांच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न होत असल्याचे अलीकडील घटनांमधून समोर आले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात त्यांच्या सत्यशोधक, समतावादी आणि परिवर्तनवादी विचारांना विरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्तींना राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुरस्कार जाहीर होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित निर्णय घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत राज्यभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राष्ट्र सेवा दलाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये श्रीमती उज्ज्वला गौड यांचे नाव समाविष्ट होते. त्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या असून महाराष्ट्र सनातन सेनेच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सेन्सॉरशिपच्या मागणीसाठी सक्रिय असल्याचे सार्वजनिकरीत्या ज्ञात आहे. सनातनी विचारसरणीविरोधात महात्मा फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अशा परिस्थितीत त्यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात या विचारसरणीशी संबंधित व्यक्तीला राष्ट्र सेवा दलाचा पुरस्कार जाहीर होणे हा मोठा वैचारिक विरोधाभास आहे.
या पुरस्कार निर्णयामागे माजी आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे आणि राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांची भूमिका असल्याचे समोर आले आहे. सजग सेवा दल कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केल्यानंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर संबंधितांकडून हा निर्णय अनवधानाने झाल्याचे सांगत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र, राष्ट्र सेवा दलाच्या नावाने पुरस्कार जाहीर करताना संबंधित व्यक्तींची वैचारिक पार्श्वभूमी तपासण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची नाही काय? ही बाब केवळ अनवधानाने घडली, असे सांगून जबाबदारी झटकता येणार नाही. संघटनेच्या वैचारिक भूमिकेशी विसंगत निर्णय घेण्यामागील कारणांची स्पष्टता झाली पाहिजे.
अजित शिंदे यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना संघटित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे सांगितले जाते. मात्र, राजकीय गणिते जुळविणे किंवा पराभूत उमेदवारांचे राजकीय पुनर्वसन करणे हे राष्ट्र सेवा दलाचे उद्दिष्ट कधीच नव्हते. संघटनेचा वापर अशा राजकीय हेतूंसाठी होत असल्याचा आरोप गंभीर असून त्याची दखल घेणे आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांपासून माजी आमदार कपिल पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे राष्ट्र सेवा दलाच्या संघटनात्मक रचनेत बदल घडवून आणले जात असल्याचा आक्षेप कार्यकर्त्यांकडून घेतला जात आहे. सेवा दलासाठी आयुष्य वेचलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना, पूर्णवेळ कार्यकर्त्यांना आणि संघटनेच्या वैचारिक परंपरेशी निष्ठा राखणाऱ्यांना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्याऐवजी विशिष्ट राजकीय पक्ष आणि शिक्षक संघटनांशी संबंधित व्यक्तींना संघटनेतील पदांवर संधी दिली जात असल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात सादर करण्यात आलेला घटनादुरुस्तीचा प्रस्ताव आणि चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांनी फेटाळल्याचा दावा संबंधित कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या अधिकारांचा आणि नियुक्त्यांच्या वैधतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरीही संबंधितांनी पदे न सोडता संघटनेच्या वैचारिक भूमिकेशी विसंगत निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्र सेवा दलाचे जुने-जाणते कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, पूर्णवेळ कार्यकर्ते आणि हितचिंतक या घडामोडींविरोधात आवाज उठवत आहेत. संघटनेची लोकशाही, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा तसेच तिची ऐतिहासिक परंपरा याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, राज्य अध्यक्ष राजा कांदळकर आणि संबंधित विश्वस्त यांनी आपल्या पदांचे तातडीने राजीनामे द्यावेत आणि संघटनेच्या कामकाजापासून दूर व्हावे, अशी आमची ठाम मागणी आहे.
राष्ट्र सेवा दल ही कोणत्याही व्यक्तीची किंवा राजकीय गटाची खासगी मालमत्ता नाही. ती लोकशाही, समता, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांसाठी उभी राहिलेली ऐतिहासिक चळवळ आहे. या संघटनेची वैचारिक ओळख आणि प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची सामूहिक जबाबदारी आहे.
या मागणीला आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत.
आपले,
न्या. प्रकाश परांजपे (माजी कार्यकारी विश्वस्त)
प्रकाश कांबळे (माजी राष्ट्रीय अध्यक्ष)
झेलम परांजपे (माजी विश्वस्त)
सुरेश खैरनार (माजी राष्ट्रीय अध्यक्ष)
राजाभाऊ अवसक (माजी राज्य अध्यक्ष)
अर्जुन कोकाटे (माजी राज्य अध्यक्ष)
युवराज मोहिते (ज्येष्ठ पत्रकार)
राजन इंदुलकर (सेवा दल सैनिक)
उल्का महाजन (सामाजिक कार्यकर्त्या)
निरंजन टकले (ज्येष्ठ पत्रकार)
ॲड. वर्षा देशपांडे
संजय गायकवाड
अश्विनी सातव-डोके (माजी महामंत्री)
दत्ता पाकिरे
बाळासाहेब गायकवाड (राज्य मंडळ सदस्य)
संपर्क : अश्विनी सातव-डोके
मोबाईल : 9881191363
