- ‘पीएमआर’मधील उद्योजकांसाठी उपाययोजना करा
- ‘पाईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ च्या माध्यमातून केली मागणी
पिंपरी-चिंचवड : आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्योजकांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. इराण, इस्त्राईल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्चा माल, इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्टयातील लघु उद्योजक मोठ्या संकटात आहेत. यासाठी राज्य व केंद्र सरकारने ठोस उपायोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ च्या माध्यमातून आमदार लांडगे यांनी उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. लघु उद्योजकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात. कारण, उद्योजक बंद पडतील, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उद्योजकांना कर सवलत, अनुदान, आणि आर्थिक मदत यांसारख्या उपायांनी उद्योगांना बळ द्यावे, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्या या परिस्थितीत त्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम सहन करीत आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती युद्धजन्य असल्यामुळे गॅस आणि कच्चा मालाचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे उत्पादन ठप्प झाले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरसुद्धा तुटवडा आहे. ॲल्युमिनिअम आणि कॉपरसह इतर धातुंचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत.
प्रतिक्रिया :
“लघु उद्योजक हे आपल्या राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या त्यांना मोठे आव्हान आहे. पण, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी त्यांना संकटातून बळकट करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कर सवलत, अनुदान, कर्ज सुलभता आणि इंधन-गॅस पुरवठा यांसारख्या उपायांनी उद्योग टिकतील, रोजगार राहतील आणि महाराष्ट्राचा आर्थिक विकास चालू राहील. भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून संकटात सापडलेल्या उद्योजकांना दिलासा मिळेल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
