निगडीतील मॉडर्न हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

 


विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातील संधी शोधाव्यात – डॉ. आशिष शेळके यांचे मार्गदर्शन

निगडी (शिवानंद चौगुले) : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, निगडी येथे २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बंगळुरू येथील वैज्ञानिक डॉ. आशिष शेळके यांनी विद्यार्थ्यांना संशोधन व आधुनिक विज्ञान क्षेत्रातील करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गंगाधर वाघमारे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय व सत्कार श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी केला. यावेळी सायन्स ऑलिम्पियाडमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. आशिष शेळके यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरसोबतच संशोधन, एव्हिएशन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संधींकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. संशोधन क्षेत्रात जिज्ञासा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि चिकाटी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “Powering the Future with Energy Conservation” या विषयावर रंगोळी स्पर्धा तसेच “Contribution of Indian Scientists” या विषयावर पीपीटी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि विज्ञानावरील अभ्यासाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती वाघोलीकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पल्लवी सूर्यवंशी यांनी करून दिला. शेवटी सो. अमृता गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या समन्वयक सुजाता बलकवडे, वंदना पांडे, राजीव कुटे यांसह शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विज्ञान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची प्रेरणा निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

थोडे नवीन जरा जुने