पिंपरी-चिंचवड : शिवतेजनगर, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या निमित्ताने ११ ते १७ मार्च दरम्यान “श्रीपाद श्रीवल्लभ पारायण” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत दररोज पारायण करण्यात येऊन परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
प्रकट दिनी सकाळी ६.३० वाजता अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर होम-हवन व विशेष पूजा विधी पार पडले. सकाळची महाआरतीही मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली.
दिवसभर विविध भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक तसेच परिसरातील विविध भजन मंडळांनी सहभाग घेतल्याने वातावरण अधिक भक्तिमय झाले. संध्याकाळी आयोजित भक्ती संगीत कार्यक्रमाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
यानंतर संध्याकाळची महाआरती पार पडली. महाआरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन माजी नगरसेवक मा. श्री. नारायण बहिरवाडे (संस्थापक-अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
“अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आध्यात्मिक एकात्मता दृढ होते,” असे मत श्री. बहिरवाडे यांनी व्यक्त केले.
