ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

 


वार्ताहर : शिवानंद चौगुले

पिंपरी चिंचवड : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दरमहा आयोजित केला जाणारा एकत्रित अभिष्टचिंतन सोहळा बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी ओम शांती गंगा विरंगुळा केंद्र येथे अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यात वंदनाताई सोहनी, यशवंत कन्हेरे, उषाताई तळपटे, उषाताई गायकवाड, रमाकांत ताटकर, सरोजिनीताई मुळे, मधुकर धकाते, दीपक साळुंखे, सुनंदाताई खन्नुकर आणि किसन गायकवाड यांचा वाढदिवस निमित्ताने सन्मान करण्यात आला. पंचारती ओवाळून, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पेढे देत सर्व ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.

ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ हा पिंपरी-चिंचवड शहरातील एक नामांकित व आदर्श संघ असून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रशासकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांना मानसिक आधार, सन्मान आणि आनंद देण्याचे कार्य संघ सातत्याने करत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात श्री विश्वास सोहोनी यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर यशवंत कन्हेरे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान, जबाबदाऱ्या आणि संघाच्या कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले. मधुकर धकाते यांनी सत्कारमूर्तींच्या वतीने आभार व्यक्त केले.


या प्रसंगी सदस्यांनी गाणी, कविता आणि मनोगतांच्या माध्यमातून वातावरण आनंदमय केले. विशेष म्हणजे, सन्माननीय सदस्यांच्या कुटुंबातील एका लहान नातीने अत्यंत निरागस व हृदयस्पर्शी शब्दांत आपल्या आजी-आजोबांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. तिच्या या भावनिक आणि सुंदर अभिव्यक्तीने उपस्थित सर्वांची मने जिंकली. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत तिचे मनापासून कौतुक करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला आणखी एक भावनिक आणि आनंददायी उंची प्राप्त झाली.

मोठ्या संख्येने सदस्य, कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

समारोप प्रसंगी शिवानंद चौगुले यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर भोजनोत्तर कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.

ज्येष्ठांनी आनंदी, सक्रिय आणि समाजाभिमुख जीवन जगावे, एकमेकांना आधार देत सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करावी, हा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने