पिंपरी चिंचवड : संस्कार भारती, पश्चिम प्रांत, पिंपरी चिंचवड समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड परिसरात प्रथमच भव्य ‘अभिव्यक्ती कलामहोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव शनिवार, २५ एप्रिल व रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी-प्राधिकरण येथे पार पडणार आहे.
या दोन दिवसीय महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ कलाकार तसेच स्थानिक कलाकार विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांच्या हस्ते होणार असून, आमदार महेशदादा लांडगे, महापौर रवीजी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कैलास कुटे, पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि सतीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, २५ एप्रिल रोजी ओजस हिरानी यांचे ‘भारतीय मंदिर स्थापत्यकला’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याशिवाय संजीवनी महिला शाहीरी पथकाची लोककला, ‘नृत्यपंढरी’ हा संत रचनांवरील नृत्यप्रयोग, पं. श्रद्धा हर्डीकर-शिंदे आणि डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांचे कथक नृत्य तसेच पं. कैवल्यकुमार गुरव यांचे शास्त्रीय गायन असे विविध कार्यक्रम रंगणार आहेत.
रविवार, २६ एप्रिल रोजी पं. भावार्थ देखणे यांचे बहुरूपी भारूड, ‘आठवणींचा गाव’ हा नाट्यप्रयोग, कै. आशा भोसले यांना स्वरांजली, पं. सुधाकर चव्हाण यांचे गायन, नृत्यांगना संध्या पुरेचा यांचे भरतनाट्यम, तसेच पद्मश्री पं. रोणू मजूमदार यांचे बासरीवादन हे कार्यक्रम सादर होणार आहेत. ‘त्या तिघी – स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात वीरांगना’ हा विशेष कार्यक्रमही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
यासोबतच स्थानिक चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन दोन्ही दिवशी आयोजित करण्यात आले आहे.
सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कला महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
