कष्टकरी रिक्षा - टॅक्सी संघर्ष महासंघाची परिवहन अधिकारी यांच्याकडे मागणी
पिंपरी चिंचवड, दि. ९ - महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा चालक व टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी महामंडळ व्हावे यासाठी संघटनानी अनेक वेळा आंदोलने केले आता राज्य शासनाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. मात्र जास्त शुल्क आणि संपर्क अभावाने राज्यात नोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे म्हणून परिवहन विभागाकडून नोंदणीची संख्या मोठ्या प्रमाणात होण्यासाठी स्वतंत्र अभियान राबवावी अशी मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे कष्टकरी रिक्षा - टॅक्सी संघर्ष महासंघ तर्फे आज करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यांमध्ये केवळ मागील महिन्यात केवळ १ ३३३ नोंद केल्याचे चित्र मार्चमध्ये होते. महासंघाचे शिष्टमंडळाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही विधान भवन मुंबई येथे भेट घेऊन रिक्षाचालकांसाठी विविध योजना व अडचणी यावर चर्चा करून अनेक बाबी निदर्शनास आणून दिल्या होत्या. यावर आपण राज्यात विशेष अभियान राबवून नोंदणी अधिक करण्याचे आश्वासन दिले होते.
राज्यातील मंडळांपैकी सर्वाधिक नोंदणी शुल्क याच मंडळामध्ये आहे. नोंदणी शुल्क ५०० व वार्षिक ३०० रुपये असे ८०० रुपये शुल्क भरावे लागत असल्याने रिक्षा चालक, टॅक्सीचालक शुल्क जास्त असल्याने टाळाटाळ करत आहे. हे शुल्क कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने रिक्षा चालक आहेत मात्र मंडळात नोंदणी अत्यल्प झालेली आहे, ही नोंदणी वाढवण्यासाठी परिवहन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी नोंदणी अधिकाधिक होणे गरजेचे आहे रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी आवश्यक सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, नाना कसबे, राजू बोराडे, अतिश वडमारे, विशाल सरवदे, राजू व्हनमाने, रामभाऊ कांबळे, दिनकर खांडेकर, सुभाष वाशिमकर आदीसह रिक्षाचालक उपस्थित होते.
