पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत आणि विनापरवाना जाहिरात फलकांविरोधात कठोर पाऊल उचलत कारवाई सातत्याने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये विनापरवाना उभारण्यात आलेले दोन जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात जाहिरात फलक उभारण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण ९ मे २०२२ च्या अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊनच खासगी जागेत जाहिरात फलक उभारण्याची तरतूद आहे. या नियमांचे पालन न करता पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात आलेले जाहिरात फलक हटवण्याचे काम महापालिकेतर्फे सातत्याने करण्यात येत आहे. या अंतर्गत कातळेवस्ती, एन.डी.एस. बँक्वेट्स लॉन समोर, किवळे येथे उभारण्यात आलेले २० बाय २० आकाराचे दोन तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरासमोर उभारण्यात आलेला १० बाय १० आकाराचा एक जाहिरात फलक निष्कासित करण्यात आला आहे.
तसेच महापालिकेच्या हद्दीतील सर्व जाहिरात एजन्सी, व्यावसायिक आणि संबंधितांना यापुढे कोणतेही विनापरवाना जाहिरात फलक उभारू नयेत. अन्यथा तत्काळ निष्कासनासोबतच नियमान्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून देण्यात आली आहे.
....
शहर नियोजन आणि नागरी शिस्त ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिक व व्यावसायिक यांचीही सामूहिक जबाबदारी आहे. पिंपरी चिंचवड शहर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि नियोजित ठेवण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विनापरवाना जाहिरात फलकांविरोधातील कारवाई ही केवळ अंमलबजावणी नसून शहराच्या सुव्यवस्थेसाठी घेतलेले ठोस पाऊल आहे.”
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
—----
पिंपरी चिंचवड शहराचे सौंदर्य, नागरिकांची सुरक्षितता आणि शिस्तबद्ध विकास यासाठी अनधिकृत जाहिरात फलकांना अजिबात थारा दिला जाणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने कठोर कारवाई सुरू राहील.
•राजेश आगळे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
