पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही


दररोज ६० ते ७० बॅग्जचे वितरण; आगामी रक्तदान शिबिरांतून ६०० रक्तपिशव्यांचे संकलन अपेक्षित

पिंपरी चिंचवड :  महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तकेंद्रात येथे विविध रक्तघटकांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शहरातील गरजू रुग्णांना सातत्याने रक्तपुरवठा करण्यात येत आहे. आजच्या स्थितीनुसार रक्तकेंद्रात लाल रक्तपेशींच्या २१५ बॅग्ज, प्लाझ्माच्या २१३ बॅग्ज, प्लेटलेट्सच्या ४ बॅग्ज तसेच क्रायो प्रेसिपिटेटच्या १५ बॅग्ज असा एकूण ४५० रक्तघटकांचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.

सद्यस्थितीत दररोज सरासरी ६० ते ७० रक्तघटकांच्या बॅग्जचे वितरण विविध रुग्णालयांना व गरजू रुग्णांना करण्यात येत आहे. वाढत्या मागणीचा विचार करून रक्तकेंद्राने नियोजनबद्ध पद्धतीने साठा व्यवस्थापन केले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतही रक्ताची कमतरता भासू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.

उर्वरित दिवसांमध्ये शहरात सहा ते सात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून त्यामधून अंदाजे ६०० रक्तपिशव्यांचे संकलन अपेक्षित आहे. याशिवाय दररोज सरासरी ८ ते १० रक्तदाते रक्तकेंद्रात येऊन रक्तदान करत आहेत. आवश्यकतेनुसार अधिक रक्तदात्यांना आवाहन करून तातडीने रक्तसंकलन वाढविण्याची तयारीही रक्तकेंद्राने ठेवली असल्याची माहितीही डॉ. वाबळे यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रक्तपुरवठा ही अत्यावश्यक सेवा अखंडितपणे सुरू ठेवण्यात आली असून आतापर्यंत शहरातील एकाही गरजू रुग्णाला ‘रक्त उपलब्ध नाही’ या कारणास्तव परत जावे लागलेले नाही. नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून नियमित रक्तदान करून या सेवेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेमार्फत रक्तसंकलन, साठवण आणि वितरण याचे प्रभावी व्यवस्थापन केले जात असून आगामी काळातही ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

---------

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना वेळेवर आणि पुरेसा रक्तपुरवठा होणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात उपलब्ध असलेला साठा आणि त्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन याची दक्षता घेतली जात आहे. आगामी रक्तदान शिबिरे आणि नागरिकांचा वाढता सहभाग यामुळे भविष्यातील गरजाही प्रभावीपणे पूर्ण करता येतील, असा विश्वास आहे. नागरिकांनीही नियमित रक्तदान करून या जीवनदायी कार्यात सहभागी व्हावे.

-            डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

---------

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तकेंद्रात सध्या सर्व आवश्यक रक्तघटकांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शहरातील गरजू रुग्णांना अखंडितपणे रक्तपुरवठा केला जात आहे. दररोज होणाऱ्या वितरणाचा विचार करून साठा व्यवस्थापन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे. आगामी रक्तदान शिबिरांमधून रक्तसंकलन वाढवून संभाव्य मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आतापर्यंत एकाही रुग्णाला रक्तअभावी परत जावे लागलेले नाही, ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब असून नागरिकांनीही नियमित रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा.

-            डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय

थोडे नवीन जरा जुने