शिबिरात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय एकात्मता शिबिर उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संघाने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय एकात्मता शिबिर २०२५ – २६ कर्नाटक राज्यातील मैसूर विद्यापीठ येथे केले. हे शिबिर उत्साह पूर्ण वातावरणात यशस्वी झाले. या शिबिरात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा व कर्नाटक या सहा राज्यांतील स्वयंसेवक सहभागी होत ‘विविधतेत एकता’ हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे हे शिबिर सर्वांसाठी प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरल्याचे पुणे अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंगचे संघनायक व स्वयंसेवक प्रा. दिलीप घुले यांनी सांगितले.
या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या सत्रां मधून स्वयंसेवकांना राष्ट्रसेवा, नेतृत्वगुण व सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरा दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य, गीत सादरीकरण तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
महाराष्ट्र संघाने सादर केलेल्या वारी व गणेश उत्सव लोकनृत्याने विशेष दाद मिळवली. विविध राज्यांच्या संस्कृतींचा संगम या शिबिरात अनुभवता आला. या शिबिरात सहभागी झालेले संघनायक व स्वयंसेवक प्रा. दिलीप घुले (अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग, पुणे), दिक्षा तुपेरे (ए.आय.एस.एस.एम.एस अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे), अक्षदा पाचुंदकर (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर), पुजा भामे (पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी), सिद्धी गावडे ( भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे), महादेव स्वामी (ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च, पुणे), श्रावणी पाटील (हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय, पुणे), आदित्य बोरसे (संघनायक हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर), मद्रे दिलीप (जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,जुन्नर), ओम पवार (प्रतिभा कॉलेज कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, चिंचवड), सोहम आव्हाड (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अँड कॉम्प्युटर सायन्स कॉलेज,आश्वी) यांनी सहभाग घेतला. शिबिरात स्वच्छता अभियान, समूह चर्चा, नेतृत्व विकास उपक्रम तसेच सामाजिक विषयांवरील मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांमुळे स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाल्याची राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. गणेश भामे यांच्या मार्गदर्शना खाली विद्यापीठ संघाने हे शिबिर यशस्वी केले.
