वार्ताहर : शिवानंद चौगुले महाराष्ट्र जनभूमी न्यूज पोर्टल
पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेने शहरातील वाढते प्रदूषण, धुळीचे प्रमाण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन “नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम” (NCAP) अंतर्गत अत्याधुनिक डस्ट सप्रेशन व्हेईकल अर्थात धूळ नियंत्रण गाड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. शहरातील प्रमुख रस्ते, बांधकाम परिसर, औद्योगिक भाग आणि धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी पाण्याच्या फवाऱ्याद्वारे धूळ कमी करून नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. सुरुवातीच्या काही महिन्यांत या गाड्या शहरातील विविध भागांत नियमितपणे फिरताना दिसत होत्या. नागरिकांमध्येही या उपक्रमाबद्दल समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात परिस्थिती पूर्णतः बदललेली दिसत आहे. शहरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर धुळीचे लोट उडताना दिसत आहेत. मेट्रो, रस्ते विकास, खोदकामे आणि विविध बांधकाम प्रकल्पांमुळे वातावरणात धुळीचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी असलेल्या या डस्ट सप्रेशन गाड्या मात्र रस्त्यावर क्वचितच दिसत आहेत. काही गाड्या तर उद्यान अथवा एका ठिकाणी दीर्घकाळ उभ्या असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे या वाहनांचा नेमका वापर होत आहे का? त्यांची देखभाल, संचालन आणि कार्यपद्धती कोण पाहत आहे? असा गंभीर प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या गाड्यांच्या खरेदीसाठी आणि देखभालीसाठी खर्च होणारा निधी हा जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशांतूनच केला जातो. त्यामुळे “जनतेच्या पैशातून खरेदी केलेली साधने अखेर जनतेच्या सेवेसाठीच वापरली जाणार की केवळ दाखवण्यासाठी?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शहरात प्रदूषण आणि धुळीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा वेळी प्रशासनाची निष्क्रियता अधिकच खटकणारी ठरत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये अनेक वेळा योजनांची मोठी घोषणा होते, कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, परंतु काही दिवसांनंतर त्या योजना प्रत्यक्षात गायब झाल्याचे चित्र दिसते. त्यामुळे “अकार्यक्षम प्रशासन” हीच ओळख वारंवार समोर येत असल्याची टीका आता नागरिक उघडपणे करू लागले आहेत. स्वच्छ हवा, प्रदूषणमुक्त शहर आणि नागरिकांचे आरोग्य यांसारखे गंभीर विषय केवळ कागदोपत्री राहू नयेत, अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील वाढती उष्णता, धूळ आणि प्रदूषण लक्षात घेता माननीय आयुक्तांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेणे गरजेचे आहे. संबंधित विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व सेवा-सुविधा तात्काळ कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा “स्वच्छ हवा अभियान” ही संकल्पना फक्त फलकांपुरतीच मर्यादित राहील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
