!-- afp header code starts here --> भक्तिरसाने न्हाऊन निघाले यमुनानगर; श्री विष्णुसहस्रनाम माहात्म्य प्रवचन उत्साहात संपन्न

भक्तिरसाने न्हाऊन निघाले यमुनानगर; श्री विष्णुसहस्रनाम माहात्म्य प्रवचन उत्साहात संपन्न

  


शिवानंद चौगुले

पिंपरी-चिंचवड : अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभागांतर्गत भजन महासंघ, यमुनानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला "श्री विष्णुसहस्रनाम माहात्म्य" हा आध्यात्मिक कार्यक्रम अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. विष्णुसहस्रनामाच्या पवित्र उच्चारांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.

या प्रसंगी प्रवचनकार प्रियाताई जोग यांनी विष्णुसहस्रनामाचे महत्त्व विविध कथांच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि व्यवहारिक भाषेत उलगडून सांगितले. विशेषतः महिलांना सहज समजेल अशा शैलीत त्यांनी विष्णुसहस्रनामातील आध्यात्मिक संदेश स्पष्ट केला. तसेच 'हरी आणि हर हे एकच आहेत' या विषयावर त्यांनी प्रभावी विवेचन केले. विष्णुसहस्रनामामध्ये भगवान शंकराची नावे किती आणि कशा स्वरूपात आली आहेत, यासंदर्भात त्यांनी उपस्थित महिलांसाठी एक मनोरंजक शाब्दिक खेळही घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्कृती संवर्धनच्या प्रतिभाताई निफाडकर आणि वैशालीताई पांडे यांनी प्रार्थना व शंखनादाने केली. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राजक्ताताई निफाडकर यांनी केली, तर मनीषाताई गडेकर यांनी प्रवचनकार प्रियाताई जोग यांचा परिचय करून दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कोषाध्यक्ष विकास देशपांडे यांनी मंडळाच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सहसचिव शिवानंद चौगुले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले, प्रदीप मुजुमदार तसेच विविध भजनी मंडळांचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सामूहिक सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष दिव्यता प्राप्त झाली.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघ तसेच पावन मारुती मंडळ, यमुनानगर यांचे विशेष सहकार्य लाभले. अधिकमासाच्या पवित्र काळात आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम भक्ती, संस्कार आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम ठरला. सर्व कार्यकर्ते, भजनी मंडळांचे पदाधिकारी आणि उपस्थित भाविकांच्या सक्रिय सहभागामुळे यमुनानगर विभागातील हा आध्यात्मिक सोहळा अविस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

थोडे नवीन जरा जुने