!-- afp header code starts here --> अधिक ज्येष्ठ मासानिमित्त दिव्य विष्णू गायत्री याग उत्साहात संपन्न; सनातन संस्कृतीमागील विज्ञानाचा उलगडा

अधिक ज्येष्ठ मासानिमित्त दिव्य विष्णू गायत्री याग उत्साहात संपन्न; सनातन संस्कृतीमागील विज्ञानाचा उलगडा

 


वार्ताहर : शिवानंद चौगुले | 

पिंपरी चिंचवड : अधिक ज्येष्ठ मासाच्या पावन पर्वानिमित्त श्री दत्त मंदिर, संभाजीनगर (बजाज स्कूलजवळ) येथे आयोजित करण्यात आलेला दिव्य विष्णू गायत्री याग अत्यंत भक्तिमय, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ अंतर्गत संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार तसेच श्री गुरुदेव दत्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या पुण्यदायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गुरु, सरस्वती व व्यास आवाहन, षट्कर्म, देव आवाहन, विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण, षोडशोपचार पूजन, १०८ आहुतींसह विष्णू गायत्री यज्ञ, तुळजाभवानी माता व अन्नपूर्णा माता स्तोत्र, महाआरती आदी विविध धार्मिक विधी विधिवत पार पडले.

अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वारचे श्री सोमदेव पटिया, राजेंद्र देसले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञविधी संपन्न झाला. यावेळी भारतीय सनातन संस्कृतीतील विविध कर्मकांडांची परंपरा, त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजजीवनातील त्यांचे महत्त्व याविषयी उपस्थित भाविकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या विवेचनामुळे धार्मिक विधींकडे श्रद्धेबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा उपस्थितांना मिळाली.

या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सहसचिव शिवानंद चौगुले, डॉ. अजित जगताप, संस्कृती संवर्धन भजन महासंघ चिखली विभागाच्या अध्यक्षा सौ. अर्चना सोनार, श्री दत्त मंदिर राजे ट्रस्टचे ट्रस्टी युवराज पाटील तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेविका योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे आणि रीटा सचिन सानप यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यज्ञ सोहळ्याचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. श्री दत्त मंदिराच्या वतीने उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक मासात जप, यज्ञ, दान आणि भक्ती साधना यांना विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. अशा पवित्र काळात आयोजित करण्यात आलेल्या या दिव्य विष्णू गायत्री यागामुळे समाजात अध्यात्म, संस्कार आणि सनातन परंपरांबाबत जागृती निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

"यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म" या वेदवचनाचा प्रत्यय देणारा हा सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

थोडे नवीन जरा जुने