जुन्नर, दि. १० जून : जुन्नर शहरातील काही ठिकाणी उभारण्यात आलेले गतिरोधक (स्पीड ब्रेकर) हे वाहतूक नियम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नसल्याचा आरोप करत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रार केली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख शैलेश बनकर यांनी मुख्याधिकारी, जुन्नर नगरपरिषद यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच रस्त्यावर पाणी साचणे, रुग्णवाहिकांच्या हालचालींना अडथळा निर्माण होणे आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्व गतिरोधकांची पाहणी करून नियमबाह्य व चुकीच्या ठिकाणी उभारलेले गतिरोधक तात्काळ हटवावेत तसेच आवश्यक ठिकाणीच नियमानुसार गतिरोधक बसवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष रुपालीताई परदेशी, गौरीताई महेश शेटे, विधानसभा संघटक संदीप भाऊ ताजणे, महानगर संघटक मयूर रोकडे, महानगर समन्वयक शिवदर्शन खत्री, माजी शहरप्रमुख समीर भगत, माजी नगरसेवक अविनभाऊ फुलपगार यांच्यासह अमोलभाऊ बनकर, साईनाथ डोके, जालिंदर रासकर, अक्षय कुटे, शिवानंद ढेकणे, ओंकार भुजबळ, सुदर्शन भगत, चिराग बिडवई , ऋषिकेश भुजबळ, प्रितेश लोखंडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
नागरिकांच्या या मागणीला शहरवासीयांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
