मुंबई (वर्षा चव्हाण) : भारतात लवकरच कागदी चलनी नोटांच्या जागी प्लास्टिक अर्थात पॉलिमर नोटा चलनात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) या प्रस्तावाला पुन्हा चालना दिली असून, यासंदर्भात प्रायोगिक स्तरावर चाचणी करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या वापरात असलेल्या कागदी नोटांच्या तुलनेत पॉलिमर नोटा अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि दीर्घकाळ वापरता येण्याजोग्या मानल्या जातात. पाणी, ओलावा, धूळ तसेच फाटणे यांचा या नोटांवर कमी परिणाम होत असल्याने त्यांचे आयुष्य कागदी नोटांपेक्षा अधिक असते.
भारतात यापूर्वीही पॉलिमर नोटांचा प्रायोगिक वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला या शहरांमध्ये चाचणी प्रकल्प राबविण्याची योजना होती. मात्र, तो प्रकल्प पुढे पूर्णत्वास जाऊ शकला नव्हता. आता पुन्हा एकदा या योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे.
चलनी नोटांच्या छपाईवर होणारा वाढता खर्च, खराब होणाऱ्या नोटांचे प्रमाण आणि पुनर्मुद्रणाचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी पॉलिमर नोटांचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. आरबीआयच्या आकडेवारीनुसार दरवर्षी मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या नोटा चलनातून बाद कराव्या लागतात. विशेषतः 100 आणि 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.
ऑस्ट्रेलियाने 1988 मध्ये सर्वप्रथम पॉलिमर नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर कॅनडा, न्यूझीलंड, व्हिएतनाम, मालदीवसह अनेक देशांनी या नोटांचा स्वीकार केला. या देशांतील अनुभवांनुसार पॉलिमर नोटा अधिक टिकाऊ आणि बनावट नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते, पॉलिमर नोटांची नक्कल करणे तुलनेने अधिक कठीण असल्याने चलन सुरक्षेतही वाढ होऊ शकते. त्यामुळे आरबीआयकडून या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
