!-- afp header code starts here --> डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात यांना ‘सह्याद्रीरत्न समाजभूषण पुरस्कार प्रदान

डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात यांना ‘सह्याद्रीरत्न समाजभूषण पुरस्कार प्रदान

 


पुणे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात यांना नालंदा फौंडेशन व टॅलेंट कट्टा, पुणे यांच्या वतीने प्रतिष्ठेचा "सह्याद्रीरत्न समाजभूषण पुरस्कार" प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रवीवार, दि. १४ जून रोजी पुणे येथील पत्रकार भवन येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, प्रसिद्ध तबलावादक प्रशांत गायकवाड तसेच विधितज्ज्ञ पी. टी. गांधी व नालंदा फौंडेशनचे संस्थापक डॉ दीपक जाधव यांच्या हस्ते डॉ. थोरात यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल आणि मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सुमारे चाळीस मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले.

डॉ. किशोर थोरात यांना यापूर्वीही विविध सामाजिक संस्थांकडून सुमारे ४३ पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, "सह्याद्रीरत्न समाजभूषण पुरस्कार" हा त्यांचा ४४ वा सन्मान ठरला आहे. त्यांना प्राप्त झालेल्या प्रमुख पुरस्कारांमध्ये आदर्श समाजरत्न पुरस्कार, शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मधुमेहमुक्ती व व्यसनमुक्ती दूत सन्मान, समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार, राष्ट्रीय रत्न पुरस्कार, आयकॉन ऑफ आशिया पुरस्कार, महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार, समाजसेवा शिरोमणी पुरस्कार तसेच मानद डॉक्टरेट यांचा समावेश आहे.

डॉ. थोरात यांनी समाजोपयोगी अनेक अभिनव उपक्रम राबविले आहेत. "पैसे नको, रद्दी द्या", "एक झाड दत्तक योजना" आणि "एक हात मदतीचा" यांसारख्या उपक्रमांना समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सध्या ते विविध सामाजिक संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. ते सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, इंटरनॅशनल ह्यूमन राईट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष, श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था, पुणे यांचे संस्थापक अध्यक्ष, आधार शैक्षणिक संस्था, पुणे यांचे सचिव तसेच अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत.

पुरस्कार स्वीकारताना डॉ. थोरात म्हणाले, "हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्यासोबत सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचा आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या माझ्या कुटुंबियांचा सन्मान आहे. या सन्मानामुळे समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मिळाली आहे."

सध्या डॉ. थोरात पर्यावरण संवर्धनासाठी विशेष कार्य करत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे यांच्या 'हरित पिंपरी चिंचवड शहर' या उपक्रमाला प्रतिसाद देत तसेच वॉटरमॅन रमेश खरमाळे यांच्या प्रेरणेतून वृक्षारोपण मोहिम राबवत आहेत.

मागील आठवड्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी जंगल गार्डन, इंद्रायणी नगर, भोसरी येथे २५० झाडांची लागवड केली असून त्या झाडांचे संवर्धन व संगोपनाचे कार्यही सुरू आहे. तसेच त्यांच्या मूळ गावी उक्कलगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ५१ झाडांची लागवड करण्यात आली असून ३० झाडे दत्तक देण्याचा उपक्रमही राबविण्यात आला आहे.

डॉ. थोरात यांच्या कार्याचे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे तसेच पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

थोडे नवीन जरा जुने