नीट-यूजी 2026 प्रश्नपत्र फुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; लातूरमधील कोचिंग मालक अटकेत

 


लातूर : नीट-यूजी 2026 प्रश्नपत्र फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत लातूर येथील आरसीसी कोचिंग संस्थेचे मालक प्राध्यापक शिवराज मोटेगांवकर यांना अटक केली आहे. या प्रकरणातील ही दहावी अटक असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

प्रा. मोटेगांवकर हे लातूरस्थित आरसीसी कोचिंग संस्थेचे संचालक आहेत. ही संस्था विद्यार्थ्यांना NEET UG परीक्षेची तयारी करून देते. संस्थेच्या एकूण नऊ शाखा असून मुख्य शाखा लातूरमध्ये आहे. तपासादरम्यान ते एनटीएशी संबंधित रसायनशास्त्राचे व्याख्याते पी. व्ही. कुलकर्णी यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे.

सीबीआयने त्यांच्या संस्थेवर आणि निवासस्थानी छापे टाकले असता रसायनशास्त्राचा प्रश्नसंच जप्त करण्यात आला. या प्रश्नांपैकी अनेक प्रश्न 3 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेतील प्रश्नांशी जुळणारे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांत सीबीआयने विविध ठिकाणी पाच ठिकाणी शोधमोहीम राबवली. या कारवाईत अनेक संशयास्पद कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची सखोल तपासणी सुरू आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे सीबीआयने 12 मे 2026 रोजी या प्रकरणाची नोंद केली होती. त्यानंतर देशभरात छापेमारी आणि चौकशी सुरू करण्यात आली.

या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दहाव्या आरोपीला देखील न्यायालयात हजर करण्यात येत आहे.

सीबीआयच्या विशेष पथकांकडून तपास सुरू असून, परीक्षेपूर्वी रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे प्रश्नपत्र प्रसारित झाल्याचा मूळ स्रोत शोधण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या मोबदल्यात प्रश्न शिकवणे आणि चर्चा करण्यासाठी जोडणाऱ्या मध्यस्थांनाही अटक करण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने