भाजपमध्ये पक्ष संघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही - अ‍ॅड. भरत पाटील


मोरवाडी कार्यालयात शहर पक्ष संघटनेच्या कामकाजाचा घेतला आढावा

पिंपरी-चिंचवड : "राजकारणात काम करत असताना पक्ष संघटना ही नेहमी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असते. प्रत्येक कार्यकर्त्याने ही भावना मनाशी पक्की बाळगली पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षात संघटनेपेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीही नाही," असे ठाम प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त शहर प्रभारी अ‍ॅड. श्री भरतजी पाटील यांनी केले.

मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित पिंपरी-चिंचवड शहराच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अ‍ॅड. पाटील यांची प्रभारीपदी नियुक्ती केल्यानंतर आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या बैठकीला शहराध्यक्ष शत्रूघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, दिनेश यादव यांसह सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चे, आघाडी, सेल, प्रकोष्ठ आणि मंडल अध्यक्ष-सरचिटणीस उपस्थित होते. या बैठकीत अ‍ॅड. भरत पाटील यांनी शहरातील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष बळकटीकरणावर विशेष भर दिला.

याप्रसंगी शहराध्यक्ष शत्रूघ्न काटे, आमदार गोरखे यांनी देखील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जनसेवेचे व्रत घेतले आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासोबतच, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षाची ध्येयधोरणे घराघरांत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कार्यकर्त्यांचे कष्ट आणि जनतेचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून आगामी काळात पक्ष संघटना अधिक गतिमान करण्यावर आमचा भर असेल.

मोरवाडी येथील शहर भाजपा मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीला या निमित्ताने वेग आला आहे.

थोडे नवीन जरा जुने