!-- afp header code starts here --> अंदमान किनाऱ्यावर २३-२४ मे रोजी मान्सून पोहोचण्याची शक्यता?

अंदमान किनाऱ्यावर २३-२४ मे रोजी मान्सून पोहोचण्याची शक्यता?


नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या प्रचंड उष्णतेची लाट कायम असून पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह अनेक भागांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. हवामान खात्याने पुढील २-३ दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पंजाबमधील बठिंडा, फरीदकोट तसेच हरियाणातील रोहतक, हिसार या भागांत उष्णतेचा तीव्र परिणाम जाणवत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले असून शेतकरी, मजूर आणि बाहेर काम करणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.

यंदाची उष्णता गेल्या चार दशकांतील विक्रम मोडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे. पंजाबमध्ये १९८४ मध्ये बठिंडामध्ये ४८.५°C तापमानाची नोंद झाली होती, तर हरियाणातील हिसारमध्ये १९८१ मध्ये ४८.४°C तापमान नोंदवले गेले होते.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मात्र, नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे यंदा नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर पुढे सरकत आहे. अंदमान किनाऱ्यावर २३-२४ मे रोजी मान्सून पोहोचण्याची शक्यता असून केरळमध्ये २६ मेपर्यंत त्याचे आगमन होऊ शकते. उत्तर भारतात साधारण २२ जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जूनच्या तिसऱ्या आठवड्यात उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

उष्णतेमुळे वीज वापरातही मोठी वाढ झाली आहे. पंजाबमध्ये वीज मागणी १४,३३५ मेगावॅटपर्यंत पोहोचली असून एसी, कुलर यांचा वाढता वापर त्यामागील मुख्य कारण मानले जात आहे.

हवामान विभागाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी, ORS पिणे, हलक्या रंगाचे सूती कपडे वापरणे आणि हीटस्ट्रोकपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने