पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत रणनीती निश्चित

 


१ लाख वृक्षारोपण, आणीबाणी स्मरण कार्यक्रम, जागतिक योग दिन आणि मोदी सरकारच्या योजनांची जनजागृती

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टी, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने आज पिंपरी-चिंचवड आणि पुणे उत्तर (मावळ) जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण विभागीय आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा आणि विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच आगामी संघटनात्मक कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीस भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विभाग समन्वयक आ. निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष व विभाग सहसंयोजक विक्रम पावसकर, विभाग सहसंयोजक विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक विक्रम पाचपुते तसेच जिल्हा प्रभारी भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पुणे उत्तर (मावळ) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले.

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यभर “मोदी सरकारची यशस्वी वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण” हे महाअभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या चार प्रमुख कार्यक्रमांचे प्रभाग व मंडलस्तरीय नियोजन पूर्ण झाल्याची माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिली.

प्रमुख कार्यक्रम

१. पर्यावरण दिनानिमित्त १ लाख वृक्षारोपण

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात एकाच दिवशी किमान १५ हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण आठवडाभरात एक लाखांहून अधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन व जतन करण्याचा संकल्प करण्यात आला.

२. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे भव्य आयोजन

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध योग संस्था, पतंजली परिवार आणि योगप्रेमींच्या सहभागातून शहरभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

३. आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम

२५ जून रोजी आणीबाणीच्या स्मरणार्थ मंडल स्तरावर सहा विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विविध व्याख्यानांचे आयोजन करून त्या काळात तुरुंगवास भोगलेल्या ‘मिसाबंदी’ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

४. मोदी सरकारच्या योजनांचे प्रदर्शन व जनजागृती

केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंडलस्तरावर प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि लाभार्थ्यांच्या अनुभवांवर आधारित व्हिडिओ अभियानही राबविण्यात येणार आहे.

SIR’ नोंदणी अभियानात वेगवान प्रगती

बैठकीत ‘SIR’ संघटन नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात आला. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदणीचे काम वेगाने सुरू असून सुमारे ४० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिली. पुढील १५ दिवसांत हा आकडा ५० टक्क्यांहून अधिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निरंजन डावखरे यांचे मार्गदर्शन

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना आ. निरंजन डावखरे यांनी पिंपरी-चिंचवड भाजपच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील प्रत्येक उपक्रम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात पिंपरी-चिंचवड शहर नेहमीच राज्यात आघाडीवर राहिले आहे. आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि ‘SIR’ नोंदणी अभियानातील प्रगती पाहता शहर संघटनेने पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.”

बैठकीस आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, माजी खासदार अमर साबळे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार अश्विनी जगताप, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सदाशिवराव खाडे, वैशालीताई खाडये, विकास डोळस तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मावळ परिसरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन योगेश बाचलं यांनी केले, तर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

थोडे नवीन जरा जुने