पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : अधिक ज्येष्ठ मासानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ अंतर्गत महिला विभाग व भजनी मंडळ महासंघ, प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन जी. एस. कदम सभागृह येथे “विष्णु सहस्त्रनाम व षोडश नामावलीचे जीवनातील महत्त्व” या विषयावरील पठण व प्रेरणादायी विवेचन कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला अध्यात्मप्रेमी भगिनी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, प्रार्थना व श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी नव्याने निवड झालेल्या कोषाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रभावी सूत्रसंचालन सौ. उषाताई जाधव यांनी केले. प्रास्ताविक सौ. ज्योतीताई कानिटकर यांनी केले, तर महिला विभागाच्या वतीने सौ. वनीता राईलकर यांनी मनोगत व्यक्त करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रमुख वक्त्या श्रीमती प्रियाताई जोग यांनी विष्णु सहस्त्रनाम व षोडश नामावलीचे आध्यात्मिक, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत स्पष्ट केले. औषध घेताना ‘विष्णु’, भोजन करताना ‘जनार्दन’, शयन करताना ‘पद्मनाभ’, प्रवासात ‘त्रिविक्रम’ आणि संकटसमयी ‘मधुसूदन’ या नामांचे स्मरण करण्यामागील आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी उलगडून सांगितला.
नामस्मरण ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा असून जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. नामस्मरणामुळे मानसिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त होते. व्यक्तीच्या चारित्र्यनिर्मितीसह समाजात सुसंस्कार रुजविण्याचे कार्य नामस्मरणातून घडते. राष्ट्र अधिक सक्षम व संस्कारित करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नामस्मरणाची सवय जोपासावी आणि सेवाभावातून समाजकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्रीमती प्रियाताई जोग यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यास श्रीमती माधुरीताई ओक यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच नगरसेविका शैलजाताई मोरे, संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, महिला विभागाच्या सदस्या, भजनी मंडळ महासंघाचे प्रतिनिधी तसेच अनेक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात प्रतिमा पूजन व विवेचन श्रीमती प्रियाताई जोग यांनी केले, तर विशेष मार्गदर्शन डॉ. अजित जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. मृणाल कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
भक्ती, संस्कार आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. अल्पोपहार व चहापानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
