धर्मस्वातंत्र्य अबाधित ठेवत समान नागरी कायद्याची गरज – प्रदीप रावत


 वार्ताहर : शिवानंद चौगुले

पिंपरी चिंचवड : सहिष्णू समाजाने असहिष्णू विचारांना वेळेत आळा घालणे अत्यावश्यक असून, लोकशाही व्यवस्थेत सर्वांना समान अधिकार मिळत असताना कायद्यापुढे सर्व समान असावेत, यासाठी समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले.

निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पात ‘भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमास व्यासपीठावर डॉ. गिरीश आफळे, अध्यक्ष विजयशंकर कर्ता, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अजित जगताप यांनी प्रास्ताविक करत व्याख्यानमालेची परंपरा आणि नव्या उपक्रमांची माहिती दिली. सलग ४२ वर्षे व्याख्यानमाला सुरू ठेवण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार डॉ. गिरीश आफळे यांनी व्यक्त केले.



प्रदीप रावत यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. लोकमान्य टिळक यांनी लखनौ कराराद्वारे पुढाकार घेतला, तर महात्मा गांधी यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. त्यानंतरच्या ऐतिहासिक घडामोडींमुळे समाजात विविध प्रवाह निर्माण झाले असून, भारत-पाकिस्तान फाळणी आणि बांगलादेश निर्मितीमुळे उपखंडातील राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे समाजात स्वाभिमानाची जाणीव निर्माण झाली, असे सांगत त्यांनी धर्मस्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित केला. “धर्मस्वातंत्र्य अबाधित ठेवतानाच कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान वागणूक मिळणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. हर्षदा पोरे यांनी केले. शिवानंद चौगुले व रश्मी दाते यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला, तर प्रशांत पेडणेकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

थोडे नवीन जरा जुने