मनीला: दक्षिण फिलिपाइन्समध्ये सोमवारी सकाळी 7.8 रिश्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपानंतर काही किनारी भागांमध्ये त्सुनामीचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.
भूकंपामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, जीवित किंवा वित्तहानीबाबत तातडीने कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
फिलिपाइन्सच्या ज्वालामुखी व भूकंप विज्ञान संस्थेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मिंडानाओ बेटावरील जनरल सॅंटोस शहराच्या नैऋत्येस सुमारे 13 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर होती. हा धक्का सकाळी 7.37 वाजता जाणवला.
पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर (PTWC) ने इशारा दिला आहे की फिलिपाइन्सच्या काही किनारपट्ट्यांवर 3 मीटर (10 फूट) उंचीपर्यंत त्सुनामीच्या लाटा उसळू शकतात. तसेच इंडोनेशिया आणि मलेशियाच्या काही किनारी भागांमध्ये 1 मीटरपर्यंत उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे.
फिलिपाइन्सच्या ज्वालामुखी व भूकंप विज्ञान संस्थेचे प्रमुख टेरेसिटो बाकोलकोल यांनी किनारी भागातील नागरिकांना तातडीने उंच ठिकाणी किंवा समुद्रकिनाऱ्यापासून दूर सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले.
तैवान, जपान, गुआम, पापुआ न्यू गिनी तसेच पश्चिम पॅसिफिकमधील काही बेटांवरही लहान त्सुनामी लाटांचा प्रभाव जाणवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, हवाई किंवा अमेरिकेच्या मुख्य भूभागाला कोणताही धोका नसल्याचे PTWC ने स्पष्ट केले आहे.
भूकंपाचे धक्के इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी आणि उत्तर मालुकू प्रांतांमध्येही जाणवले. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने (USGS) सांगितले की मुख्य भूकंपानंतर 6.1 रिश्टर तीव्रतेपर्यंतचे अनेक आफ्टरशॉक्स (पश्चातधक्के) नोंदवले गेले.
फिलिपाइन्स हा जगातील सर्वाधिक नैसर्गिक आपत्तीग्रस्त देशांपैकी एक मानला जातो. तो पॅसिफिक महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ या भूकंपीयदृष्ट्या सक्रिय पट्ट्यात स्थित असल्याने येथे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक होतात. याशिवाय, दरवर्षी सुमारे 20 चक्रीवादळे आणि उष्णकटिबंधीय वादळांचाही या देशाला फटका बसतो.
