नवयुग सार्वजनिक वाचनालयातील अतिक्रमण, सुविधांचा अभाव आणि वर्तमानपत्रांचा तुटवडा; आयुक्तांना ई-मेलद्वारे निवेदन
वार्ताहर : शिवानंद चौगुले
पिंपरी चिंचवड : वाचन संस्कृती जपण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असताना पिंपरी-चिंचवड शहरातील काही सार्वजनिक वाचनालयांची अवस्था मात्र चिंताजनक बनल्याचे समोर आले आहे. कृष्णानगर प्रभाग क्रमांक ११ मधील महात्मा फुले नगर येथे असलेल्या नवयुग सार्वजनिक वाचनालयाच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीतही या वाचनालयाच्या जागेचा मूळ उद्देश हरवून तेथे अन्य वापर होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे वाचनप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या 'फ' क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आकुर्डी-चिखली रोडवरील पेठ क्रमांक १८, महात्मा फुले नगर येथे असलेले नवयुग सार्वजनिक वाचनालय हे परिसरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्ञानाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र, सध्या येथे नियमित वर्तमानपत्रांचा पुरवठा होत नसल्याने वाचकांना अद्ययावत माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच वाचनालयातील खुर्च्या, टेबल आणि इतर सुविधा अत्यंत जीर्ण झाल्याने वाचकांना बसून वाचन करणेही अवघड झाले आहे.
याशिवाय वाचनालयालगत असलेल्या एका चिकन सेंटरकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यावसायिकांकडून विविध साहित्य वाचनालय परिसरात ठेवले जात असल्याने स्वच्छता, शांतता आणि वाचनासाठी आवश्यक वातावरण बाधित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिणामी वाचनालयाचे पावित्र्य धोक्यात आले असून भविष्यात हे वाचनालय बंद पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा नागरिक प्रतिनिधी शिवानंद चौगुले यांनी महापालिका आयुक्तांना सविस्तर ई-मेल पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात नवयुग सार्वजनिक वाचनालयाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुशोभीकरण करणे, नियमित वर्तमानपत्रे व वाचन साहित्य उपलब्ध करून देणे, परिसरातील अतिक्रमण हटविणे तसेच संपूर्ण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक वाचनालयांचे सर्वेक्षण करून त्यांच्या आधुनिकीकरणासाठी व्यापक धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाचनालये ही केवळ पुस्तके ठेवण्याची जागा नसून समाजाच्या बौद्धिक विकासाची केंद्रे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विधायक विरंगुळा आणि समाजात वाचन संस्कृती रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही वाचनालये करीत असतात. त्यामुळे अशा संस्थांकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ज्ञान, संस्कार आणि वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेने सकारात्मक भूमिका घेत तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
