पिंपरी चिंचवड : केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शुक्रवारी ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह अन्य महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना क्र. एस.ओ. ३८८ (अ) द्वारे घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ जाहीर केले असून १ एप्रिल २०२६ पासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही घनकचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नव्या नियमांची माहिती देण्यासाठी आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, घनकचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे ही काळाची गरज आहे. स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहर उभारण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मोठ्या आस्थापनांना नियमांच्या पालनासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार असून शहर विद्रूप करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक नागरिकाने शहराला स्वतःचे घर समजून स्वच्छतेसाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. लोकसहभागातूनच स्वच्छ आणि सुंदर शहर घडू शकते, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी फूटपाथ, रस्ते आणि अतिक्रमणांवरील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात पिंपरी चिंचवड शहर देशातील स्वच्छ आणि आदर्श शहरांमध्ये अग्रस्थानी असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आयुक्तांच्या हस्ते ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्यान, पर्यावरण आणि आरोग्य विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
