सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे १२ दिवस शिल्लक
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या विविध कर सवलतींचा अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारी (२० व २१ जून तसेच २७ व २८ जून) महापालिकेच्या सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काऊंटर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८ जून पर्यंत ३८१ कोटी ६० लाख रुपयांचा कर भरणा झाला आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मालमत्ताधारकांना विविध सवलती जाहीर केल्या जातात. यंदाही ३० जून २०२६ पर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षक सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांपर्यंत सवलतींची माहिती पोहोचवण्यासाठी कर संकलन विभागाकडून एसएमएस, दूरध्वनीद्वारे संपर्क, जनजागृती मोहिमा, होर्डिंग्ज, सामाजिक माध्यमे तसेच विविध प्रचार माध्यमांचा वापर करून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय कार्यालयातील सहायक मंडल अधिकारी आणि गट लिपिक मालमत्ताधारकांशी थेट संपर्क साधून त्यांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.
या प्रयत्नांमुळे चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये कर संकलनाला गती मिळाली असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली आहे. ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध असली तरी अनेक नागरिक प्रत्यक्ष कार्यालयात येऊन रोखीने किंवा इतर माध्यमांतून कर भरत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि शेवटच्या दिवसांतील गर्दी कमी करण्यासाठी शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने सर्व मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात येत आहे की, उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा आणि शहर विकासात आपले योगदान नोंदवावे.
-----
शहराच्या प्रगतीमागे करदात्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. महापालिकेने दिलेल्या सवलतींचा लाभ घेत प्रत्येक नागरिकाने ‘माझा कर, माझे शहर’ ही भावना जपावी.
रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
----
करदात्यांना अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. उपलब्ध सुविधांचा उपयोग करून नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वी कर भरणा करावा.
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
----
३० जून ही सवलतींचा लाभ घेण्याची अंतिम संधी आहे. कर संकलन विभागाकडून एसएमएस, दूरध्वनी, जनजागृती मोहिमा आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे मालमत्ताधारकांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. शेवटच्या दिवसांतील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा.
सचिन पवार, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
