!-- afp header code starts here --> मनपा सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करा, अन्यथा न्यायालयात दाद मागू - ॲड. असीम सरोदे

मनपा सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करा, अन्यथा न्यायालयात दाद मागू - ॲड. असीम सरोदे

 


सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती सभेचेही लाईव्ह प्रक्षेपण करा - नगरसेवक संदीप वाघेरे 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सोमवार पासून होणाऱ्या सर्व साधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण प्रतिबंध केला असून हे बेकायदेशीर आहे. पुढील १५ दिवसात पूर्वीप्रमाणे सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करावे, अन्यथा नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करून दाद मागू असा इशारा ॲड. असीम सरोदे यांनी दिला. 

सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे उपस्थित होते. 

   ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले की, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सभांचे लाईव्ह प्रक्षेपण सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करणे आणि ते शासनाच्या वेबसाईटवर सात दिवसात प्रसिद्ध करणे हे आवश्यक आहे. याबाबत आम्ही यापूर्वीच शासनाकडे पत्रव्यवहार केला असून नगरपरिषद प्रशासन संचालनालय आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून महानगरपालिकेतील प्रशासन आणि नगरसेवक यांचा भ्रष्टाचार सामान्य जनतेपुढे येऊ नये. यासाठी मनमानी पद्धतीने प्रक्षेपण बंद करीत आहेत. लोकशाही मध्ये पारदर्शकता महत्वाची आहे. सभागृहात चालणारे कामकाज सर्व सभासद आणि मतदारांना जाणून घेण्याचा अधिकार आहे असेही ॲड सरोदे यांनी सांगितले.

  नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सांगितले की, सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती सभेचे देखील लाईव्ह प्रक्षेपण केले जावे. सभेत चालणारे कामकाज जाणून घेण्याचा अधिकार घटनेने सर्व नागरिकांना दिला आहे याचे प्रशासनाने पालन करावे अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली.


थोडे नवीन जरा जुने