!-- afp header code starts here --> अन व औषध प्रशासनाची मोठ कारवाई; ३१.७३ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

अन व औषध प्रशासनाची मोठ कारवाई; ३१.७३ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त




पुणे (वर्षा चव्हाण) : अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात भेसळयुक्त व संशयित अन्नपदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवत १ व २ जून २०२६ रोजी विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले. या कारवाईत तब्बल ३१ लाख ७३ हजार रुपयांचा भेसळयुक्त व संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली, अशी माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिली.

अन्न सुरक्षा आयुक्तांच्या "सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र" या मोहिमेअंतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विविध आस्थापनांवर धडक कारवाया करण्यात आल्या. संबंधित जिल्ह्यांतील सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

साताऱ्यात २१.४० लाखांचा साठा जप्त

सातारा जिल्ह्यातील गोडोली येथे मेसर्स धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्स प्रा. लि. येथे छापा टाकून प्रोटिरिच-डब्ल्यू हर्बल हेल्थ ड्रिंक, चॉकलेट कंपाऊंड आणि सी बकथॉर्न ज्यूस यासह २१ लाख ४० हजार ९४६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

पुणे जिल्ह्यात डेअरी व तेल व्यावसायिकांवर कारवाई

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील मेसर्स प्राज ट्रेडर्स येथून ५ लाख ३४ हजार २५२ रुपयांचे रिफाइन्ड सोयाबीन व पामोलीन तेल जप्त करण्यात आले. तर चिंचवडमधील महाराष्ट्र मिल्क डेअरी येथे २७ हजार ६०० रुपयांचे ‘चीज ॲनालॉग’ जप्त करण्यात आले.

याशिवाय वडगाव शेरीतील विठूमाऊली डेअरी येथून भेसळयुक्त गाईचे तूप व पनीर, तर खराडीतील शिवदत्त डेअरी येथून १ लाख ७३ हजार रुपयांहून अधिक किमतीचे पनीर जप्त करण्यात आले.



कोल्हापूरमध्ये तेल व सुपारी साठ्यावर धाड

कोल्हापूर जिल्ह्यातील बनछोडे ब्रदर्स ऑईल मिल येथून ९२ हजार रुपयांचे तेल जप्त करण्यात आले. तसेच इचलकरंजीतील रामगोपाल भवरलाल सोनी येथून ९७ हजार ६०० रुपयांचा सोयाबीन तेल साठा जप्त करण्यात आला. शिरोळ तालुक्यातील हिदांश इंडस्ट्रीज येथे लेबलदोष व मिथ्याछाप आढळल्याने ॲनालॉग सुपारीचा साठा जप्त करण्यात आला.

१४ ठिकाणी धाडी; ५.४५ लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त

पुणे विभागातील १४ आस्थापनांवर धाड टाकून ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. बाणेर, हिंजवडी, इंदापूर, सातारा, अकलूज, बार्शी आणि सांगली परिसरातील पानटपऱ्या व विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली.

इंदापूरमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांसह १.५० लाख रुपयांची वाहतूक करणारी गाडी जप्त करण्यात आली. अकलूजमध्ये गुटखा बनविणारे यंत्रही जप्त करण्यात आले.

मोहिमेला पुढेही सुरू राहणार वेग

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या तसेच बेकायदेशीररीत्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अशा कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने