!-- afp header code starts here --> अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी

 

संत साहित्यिक प्रा.डॉ.रामकृष्णा महाराज पाटील यांची नियुक्ती

निवडीचे विभागात स्वागत ; अभिनंदनाचा वर्षाव 

आळंदी ( अर्जुन मेदनकर )  : रावेत ( पुणे) येथील राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक,संत साहित्याचे अभ्यासक, अध्यात्मिक ग्रंथांचे लेखक, महाराष्ट्रातील संतपरंपरेवर विपुल लेखन करणारे अभंग चरित्रकार, कथाकार, कादंबरीकार, कवी तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित साहित्यिक विद्यावाचस्पती प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

     अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शुभांगीताई काळभोर यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, या नियुक्तीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार आहे.

सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत परिषदेने प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संतवाङ्मयाचा प्रसार, अध्यात्मिक मूल्यांची जोपासना आणि नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देण्याचे त्यांचे कार्य राज्यभर गौरविले गेले आहे.

प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील हे सुमारे दीडशेहून अधिक ग्रंथांचे लेखक असून संत साहित्य, अध्यात्म, चरित्र, कथा, कादंबरी, कविता आणि वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील संतांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यांनी संतांच्या अभंग चरित्रलेखनातून मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

या नियुक्तीमुळे पुणे विभागात साहित्य परिषदेचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचविणे, साहित्यिक चळवळींना चालना देणे तसेच सुसंस्कारित आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी साहित्याचा प्रभावी वापर करण्यास बळ मिळेल, असा विश्वास साहित्यप्रेमी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्या या निवडीबद्दल साहित्य, सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी ही संस्थेचे अभिनंदन केले.

थोडे नवीन जरा जुने