आळंदी (अर्जुन मेदनकर) : नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये आळंदी नगर परिषदेमार्फत आज फ्रूटवाले धर्मशाळा, आळंदी येथे छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागातील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणास दोन्ही विभागांतील विविध नगरपरिषदांमधील सुमारे ३०० अधिकारी व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी देवीदास टेकाडे, सहायुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, चंद्रकांत खोसे, सहायुक्त, पुणे विभाग, मच्छिंद्र घोलप, सहायुक्त, पुणे जिल्हा नगरपालिका प्रशासन विभाग, माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद यांच्यासह, आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर नगरसेविका वैजंताताई उमरगेकर नगरसेवक, विविध नगरपरिषदांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणासाठी ऑर्गनायझेशन फॉर डिझास्टर मॅनेजर्स (ODM) संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद भारद्वाज व त्यांच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या टीमने मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे कायदेशीर स्वरूप, आपत्तीपूर्व तयारी, आपत्कालीन प्रतिसाद, शोध व बचाव कार्य, विविध विभागांमधील समन्वय, आपत्तीपश्चात पुनर्वसन, आपत्कालीन संप्रेषण व्यवस्था तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये सन २०२४ ते २०२६ या कालावधीत घडलेल्या विविध आपत्तींचे विश्लेषण करून त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. शहरी पूर व पाणी साचणे, नदी पूर, दरडी कोसळणे, पूल व इतर संरचनात्मक अपयश, जाहिरात फलक कोसळणे, जीर्ण व धोकादायक इमारतींचे अपघात, वृक्ष पडणे, निवासी, व्यावसायिक व औद्योगिक आगी, कचरा डेपो दुर्घटना, पुराच्या काळातील विद्युत अपघात, रस्ते खचणे, वादळी वाऱ्यांमुळे होणारे नुकसान, संरक्षण भिंती कोसळणे, गॅस गळती, रासायनिक दुर्घटना, जलनिस्सारण व्यवस्था निकामी होणे, विद्युत पायाभूत सुविधांचे नुकसान, अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्थेवरील परिणाम तसेच पुरानंतर उद्भवणारे जलजन्य व डासजन्य साथीचे रोग या सर्व विषयांवर प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे, आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका, नागरिकांचा सहभाग, आपत्ती जोखीम कमी करणे (Disaster Risk Reduction), हवामान बदलामुळे वाढणारी शहरी आपत्तीची तीव्रता तसेच आपत्ती प्रतिरोधक (Resilient) शहरे उभारण्याच्या संकल्पनेवरही विशेष चर्चा करण्यात आली.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याची सामूहिक प्रक्रिया असल्याचे सांगितले. प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी हे कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना तात्काळ मदत, बचाव व समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व व्यवस्थापन आळंदी नगर परिषदेने उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी तसेच आयोजन समितीने मोलाचे योगदान दिले. उपस्थित सर्व सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक व प्रत्यक्ष कामकाजासाठी मार्गदर्शक ठरल्याची भावना व्यक्त केली.
