!-- afp header code starts here --> पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल २८ एकरात होणार ‘आयआयएम’

पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल २८ एकरात होणार ‘आयआयएम’

- राज्याच्या महसूल व वन विभागाकडून अध्यादेश जारी

- भाजपा आमदार महेश लांडगे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे प्रस्तावित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरच्या शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पस उभारणीली गती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी करून मोशी येथील गट क्रमांक ३२७ मधील २८ हेक्टर सरकारी जमीन नाममात्र वार्षिक भाडेपट्ट्याने संस्थेला उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भर पडणार आहे. या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या ‘व्हीजन’ मधील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प दृष्टीक्षेपात आला आहे.

शासनाने ३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार, मोशी येथील एकूण ३७ हेक्टर ०२ आर क्षेत्रापैकी २८ हेक्टर जमीन भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरला शैक्षणिक आणि प्रशिक्षण कॅम्पस उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जमिनीचा भाडेपट्टा सुरुवातीला ४९ वर्षांसाठी असून, त्यानंतर पुढील ४९ वर्षांसाठीही नूतनीकरणाची तरतूद केली आहे. यासाठी प्रतिवर्षी केवळ एक रुपया नाममात्र भाडे आकारण्यात येणार आहे.

यापूर्वी या जमिनीबाबत शासनाने बाजारमूल्यानुसार किंमत आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्य मंत्रिमंडळाने २१ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानंतर तो निर्णय रद्द करून शिक्षणाच्या व्यापक हिताचा विचार करत नाममात्र भाडेपट्ट्यावर जमीन देण्याचा सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला.

या निर्णयानुसार संबंधित जमीन केवळ शैक्षणिक आणि प्रशिक्षणाच्या उद्देशासाठीच वापरता येणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय तिची विक्री, हस्तांतरण, तारण किंवा इतर कोणताही व्यावसायिक वापर करता येणार नाही. तसेच, संस्थेच्या अभ्यासक्रमांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी, उद्योजक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्राधान्य किंवा सवलतीचा विचार करण्याची अटही शासनाने घातली आहे. आता  पिंपरी-चिंचवड परिसरात जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळणार असून, उद्योगनगरीला उच्च शिक्षणाचे नवे केंद्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक विद्यार्थ्यांसह उद्योग क्षेत्रालाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार असल्याचे मानले जात आहे.

प्रतिक्रिया :

"पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिक नगरी न राहता शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र व्हावे, हा आमचा संकल्प आहे. शहराची ओळख ‘एज्युकेशन हब’ अशी व्हावी. मोशी येथे IIM चा कॅम्पस उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्याच दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांच्या शहरातच उपलब्ध होणार असून, उद्योग आणि शिक्षण यांचा मजबूत दुवा निर्माण होईल.

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने