वारी - एकात्मतेची.. सौख्य, समाधानाची
वारीच्या वाटेवर वारकरी भक्तीरंगात रंगून गेले आहेत. वाटेत गाव लहान असो वा मोठे.. सगळीकडे भक्तीचा रंग दिसत आहे. सजावट सुरू आहे. आषाढी एकादशी जवळ आलीय. भक्तांना श्री विठ्ठल दर्शनाची आस लागली आहे..
वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे आत्यंतिक प्रेम.. त्यांना विठ्ठल भेटीची रात्रंदिवस ओढ लागलीय.. चकोराचे जीवन चंद्रावर अवलंबून. त्यासाठी जसा चकोराचा जीव व्याकुळ असतो, किंवा दिवाळीत माहेराहून बोलवणे यावे म्हणून जशी मुलगी वाट बघते, आणि भूक लागल्यावर बाळ जसे आईसाठी आकांत करते तसेच आमचे झाले आहे असे श्री तुकोबांना वाटते.. असे हे विठ्ठल प्रेम वारकऱ्यांच्या मनात दाटून आले आहे..
_भेटी लागी जीवा लागलीसे आस_
_पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥_
_पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन_
_तैसे माझे मन वाट पाही ॥_
_दिवाळीच्या मुळा लेकी आसावली_
_पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥_
_भुकेलिया बाळा अति शोक करी_
_वाट पाहे परी माऊलीची ll_
_तुका म्हणे मज लागलीसे भूक_
_धावूनी श्रीमुख दावी देवा ॥_
रामकृष्ण हरी
