!-- afp header code starts here --> वारकरी संप्रदाय

वारकरी संप्रदाय

संतकृपा झाली। इमारत फळा आली।। ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस ।।

इतिहास

भक्त पुंडलिकाचा काळ संप्रदायामधे प्रचलित आख्यायिकेनुसार संप्रदायाची सुरवात ही भक्त पुंडलिकापासून झाली. पुंडलिकाने आईवडिलांच्या केलेल्या सेवेवर प्रसन्न होऊन देव पंढरपूर इथे आले ही गोष्ट प्रसिद्ध आहे. वारीच्या दृष्टीने विचार केला तर महादेव आणि महादेवाचा परिवार हे आद्य वारकरी अशी वारकऱ्यांची कल्पना असून त्यासंदर्भातील कथा बहुतेक फडांवर सांगितल्या जातात.

शंकराचार्यांनी लिहिलेल्या स्तोत्रावरून पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सातव्या शतकात प्रसिद्ध होतं असं म्हणता येते, अर्थात या स्तोत्रामधे वारीचा अथवा संप्रदायाचा उल्लेख नाही.

संत ज्ञानदेव – नामदेवांपासून पुढचा इतिहास काळासहित सांगता येतो. त्याचं अत्यंत मार्मिक वर्णन बहिणाबाईंनी पुढील अभंगात केलं आहे.

संतकृपा झाली। इमारत फळा आली।।

ज्ञानदेवे घातला पाया। उभारिले देवालया।।

नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार।।

जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।

बहेणी फडकते ध्वजा। निरुपण आले ओजा।।

ज्ञानदेव- नामदेवांचा काळ – तेराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि चौदाव्या शतकाची सुरवात हा ज्ञानदेव- नामदेवांचा काळ आहे. ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या आधीपासून वारकरी संप्रदाय चालू आहे. या संप्रदायाला ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं एक अधिष्ठान आणि तत्वज्ञान दिलं. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची स्वतःची कीर्तनपद्धती निर्माण केली. पंढरी क्षेत्राचं, संतांचं माहात्म्य सांगितलं. संप्रदायाचा प्रसार पंजाबपर्यंत केलाच याशिवाय विविध संतांची चरित्रं आणि आत्मचरित्र लिहून एकप्रकारे डॉक्युमेंटेशन केलं.

ज्ञानदेव – नामदेव काळात संत गोरोबाकाका,सावता महाराज, चोखोबाराय, नरहरी महाराज, सेना महाराज, जनाबाई,मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानकाका,सोयराबाई, विसोबा खेचर,चांगदेव, परिसा भागवत, बंका महाराज आणि इतरही महत्त्वाची संत मंडळी होती.त्यानंतर मधल्या कालखंडात संत कान्होपात्रा आणि संत एकनाथांचे आजोबा संत भानुदास हे संत होऊन गेले.

संत एकनाथांचा काळ– सोळावे शतक हा संत एकनाथांचा काळ आहे. एकनाथ महाराजांनी संप्रदायाला भागवत ग्रंथ रुपी खांब दिला. पैठण सारख्या सनातनी क्षेत्रामधे राहून त्यांनी कर्मठतेला विरोध करत वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचे काम केलं. दीर्घायुषी असणारे संत शेख महंमद हे त्यांचे समकालीन.

तुकोबांचा काळ – सतरावे शतक हा तुकोबांचा आणि बहिणाबाईंचा काळ आहे. संत तुकोबा या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले. तुकोबांच्या काळात संताजी जगनाडे, रामेश्वर भट्ट वगैरे तुकोबांचे सहकारी असणारे संत, सत्पुरुष होऊन गेले. तुकोबांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या त्यांच्या शिष्या संत बहिणाबाई या इमारतीवरील पताका म्हणजेच ध्वज झाल्या. तुकोबांच्या नंतर झालेले संत निळोबाराय हे वारकरी परंपरेतील शेवटचे संत मानले जातात. यानंतर होऊन गेलेल्या व्यक्तींना सत्पुरुष असं संबोधतात. संत म्हणत नाहीत.

अठरावे शतक – यानंतर संप्रदायामधे अनेक फड निर्माण झाले. संत नामदेवांच्या वंशजांचा – नामदासांचा फड वगळता बहुतेक फड तुकोबांनंतरच्या काळात सुरू झालेले आहेत. या सर्व फडांनी महाराष्ट्राच्या विविध भागात संप्रदाय पोचवला आणि टिकवून ठेवला. तुकोबांच्या पश्चात त्यांच्या वंशजांनी पालखी सोहळा सुरू केला. त्याचं अनुकरण करत महाराष्ट्रातील इतर संतक्षेत्रातून सुद्धा असेच पालखी सोहळे सुरू झाले. सध्या हे पालखी सोहळे हे संप्रदायाची मुख्य ओळख बनले आहेत.

एकोणिसावे व विसावे शतक – इंग्रजांचं राज्य आल्यावर सुधारणांचं युग सुरू झालं. या काळात वारकरी संतांपासून प्रेरणा घेऊन काही व्यक्ती आणि संस्थांनी आपापल्या परीने प्रबोधनाचं काम केलं. सामान्य वारकरी या संस्थांपासून दूर होते, तर संप्रदायामधे आलेल्या नवसनातनी वर्गाने या बदलांना विरोध केला. इंग्रज सरकारच्याच काळात सरकारने तुकोबांची गाथा छापून प्रकाशित केली. यामुळे बिगरसांप्रदायिक व्यक्तीसुद्धा संतसाहित्याकडे आकर्षित झाल्या.

पुढे विद्यापीठं आणि आधुनिक अभ्यासक्रम सुरू झाले, तेव्हा मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मुख्य प्रवाह असलेला वारकरी संतांच्या साहित्याचाही अभ्यास सुरू झाला. वि. का. राजवाडे प्रभृतींनी मांडलेल्या संप्रदायकविषयक नकारात्मक विचारांचं पुढे अन्य अभ्यासकांनी खंडन केलं. अर्थात मधल्या काळात संप्रदायाविषयी नकारात्मक विचार विद्यापीठातून शिकवला गेल्याने सुशिक्षित वर्गाचा संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक झाला होता.

आधुनिक काळात सर्व विद्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू झाले. तेव्हा बदलत्या काळाची आवश्यकता लक्षात घेऊन गेल्या शतकात मामासाहेब शं.वा. दांडेकरांनी कीर्तनाच्या प्रशिक्षणासाठी जोग महाराज वारकरी शिक्षणसंस्था स्थापन केली. या संस्थेलासुद्धा आता शंभर वर्षं झालीत. या संस्थेचं अनुकरण करत अनेक शिक्षणसंस्था आळंदी आणि अन्य ठिकाणीसुरू झाल्यात. याच काळात गाडगेबाबांनी महाराष्ट्रभर कैकाडी बाबा, तनपुरे बाबा, गयाताई मनमाडकर, वंजारी बाबा, अशा शिष्यांचं जाळं उभं करून वारकरी संप्रदायाच्या विचारांचा गाभा महाराष्ट्रभर जागा ठेवला.

संत ज्ञानदेवादी भावंडांचे सातशेवे समाधी सोहळे १९९५ ते १९९७ या काळात साजरे झाले. या सोहळ्यानंतर संप्रदायाकडे माध्यमांचं अधिक लक्ष गेलं. याच दशकात प्रकाशित झालेल्या डॉ. सदानंद मोरे सरांच्या तुकाराम दर्शन या महत्त्वाच्या पुस्तकामुळे वारकरी संप्रदायाचं सामर्थ्य आणि अभ्यासकांच्या लक्षात आलं. त्यांचा संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागला आहे.

थोडे नवीन जरा जुने