पेठ क्र.१८,महात्मा फुले नगर, पिंपरी-चिंचवड | वार्ताहर – शिवानंद चौगुले
महात्मा फुले नगर येथील श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि राष्ट्राभिमानाने साजरा करण्यात आला. भारतमातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आले. त्यानंतर विश्वास सोहनी, प्रकाश कांबळे व योगेश टोरपे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन करण्यात आले, तर सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिनदादा सानप यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
राष्ट्रध्वज फडकताच उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. त्यानंतर ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महिला, पुरुष, युवक तसेच बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी मार्गदर्शन करताना यशवंत कन्हेरे यांनी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा संदेश दिला. देशसेवा केवळ सीमेवर जाऊनच करावी लागते असे नाही, तर आपल्या घरापासून, परिसरापासून आणि समाजापासून स्वच्छता व सामाजिक जबाबदारीची सुरुवात करूनही राष्ट्रसेवा करता येते, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ परिसर, जबाबदार नागरिक आणि सामाजिक बांधिलकी हीच राष्ट्रनिर्मितीची मजबूत पायाभरणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विश्वास सोहनी यांनी लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यांची जाणीव करून देतानाच नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि सामाजिक प्रश्नांबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास परिसराचा आणि शहराचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
विलास रूपटक्के यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व स्पष्ट करत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी केलेल्या संघर्षामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्याचे जतन करण्याबरोबरच राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. संजय पाटील यांनीही राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
वंचितांना सन्मान, सेवकांना आपुलकीची वागणूक देण्याचे आवाहन
कार्यक्रमाच्या समारोपावेळी शिवानंद चौगुले यांनी आभार प्रदर्शन करताना सामाजिक समतेचा आणि माणुसकीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. आपल्या परिसरात वर्षभर विविध राष्ट्रीय, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी केवळ प्रेक्षक म्हणून न राहता उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रसेवा आणि समाजसेवेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना केवळ सहानुभूती न दाखवता त्यांना आपल्या बरोबरीचे स्थान देऊन सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे आवश्यक आहे, असे चौगुले यांनी सांगितले. सामाजिक परिवर्तन हे केवळ भाषणांमधून घडत नाही, तर आपल्या दैनंदिन व्यवहारातून समानता, बंधुता आणि माणुसकीची अंमलबजावणी केल्याने घडते, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच आपल्या दैनंदिन जीवनात विविध प्रकारे सेवा देणाऱ्या व्यक्तींकडे केवळ कामगार किंवा सेवक म्हणून न पाहता त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपुलकी, आदर आणि सन्मानाची वागणूक द्यावी, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. घरगुती कामे, स्वच्छता, वृत्तपत्र वितरण, दूध वितरण, सुरक्षा, विविध सेवा आदी माध्यमातून समाजाच्या दैनंदिन जीवनात योगदान देणाऱ्या सेवकांच्या श्रमांचा सन्मान करणे हीदेखील राष्ट्रसेवाच आहे, असा व्यापक सामाजिक संदेश त्यांनी दिला.
‘स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समानतेची भावना पोहोचणे हा आहे,’ या भावनेतून सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करून चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास नगरसेविका रिटाताई सानप, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास रूपटक्के यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देतानाच स्वच्छ, सुंदर, समतामूलक, सक्षम आणि जबाबदार समाज निर्माण करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून करण्यात आला.
– शिवानंद चौगुले
वार्ताहर, महाराष्ट्र जनभूमी न्यूज
