भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील विनोद तावडे व डॉ. भारती पवार यांना महत्त्वाची जबाबदारी


नवी दिल्ली, दि. १७ | शिवानंद चौगुले :भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नव्या पदाधिकाऱ्यांची तसेच विविध संघटनात्मक जबाबदाऱ्यांची घोषणा केली आहे. १७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. नव्या नियुक्त्यांमुळे भाजपच्या राष्ट्रीय संघटनात्मक रचनेत महत्त्वपूर्ण फेरबदल झाले आहेत.

नव्या राष्ट्रीय उपाध्यक्षांमध्ये वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, डॉ. भारती प्रवीण पवार, मनप्रीत सिंह बादल, लालसिंग आर्य, प्रा. एम. नागराजा, प्रा. तारिक मन्सूर आणि डॉ. मधुचंद्रा कार यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातून डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने महाराष्ट्राच्या संघटनात्मक प्रतिनिधित्वाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेतील महत्त्वाच्या पदांवरही फेरबदल करण्यात आले आहेत. बी. एल. संतोष यांच्याकडे राष्ट्रीय महासचिव (संघटन) पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय संयुक्त महासचिव (संघटन) म्हणून शिवप्रकाश आणि सौदान सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महासचिवांच्या यादीत महाराष्ट्रातील विनोद तावडे यांच्यासह सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, डॉ. सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या संघटनात्मक कामकाजात महाराष्ट्राला पुन्हा एकदा महत्त्वाचे स्थान मिळाल्याचे दिसून येते.

याशिवाय पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी, तर राजेश मंगल यांची राष्ट्रीय संयुक्त कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कार्यालय प्रभारी म्हणून तरुण चुग आणि केंद्रीय कार्यालय सचिव म्हणून महेंद्र पांडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ईशान्य भारतासाठी डॉ. संबित पात्रा यांची समन्वयक म्हणून, तर राजीव बाब्बर यांची संयुक्त समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाच्या विविध सेल्सच्या समन्वयासाठी विष्णुदत्त शर्मा यांची ऑल सेल्स समन्वयक म्हणून नियुक्ती झाली असून, ऋतुराज सिन्हा आणि विष्णू वर्धन रेड्डी यांच्याकडे संयुक्त समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

डिजिटल व सोशल मीडिया विभागातही फेरबदल

प्रसारित माहितीनुसार, भाजपच्या डिजिटल आणि सोशल मीडिया विभागातही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. दीपक म्हास्के यांच्याकडे राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजकपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यासोबत प्रीती गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट आणि अरुण यादव यांची सह-संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मीडिया विभागात अनिल बलूनी यांची मीडिया संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, आशीष उषा अग्रवाल, प्रदीप भंडारी आणि सिद्धार्थ यादव यांच्यावर सह-संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डिजिटल कम्युनिकेशन, सोशल मीडिया आणि पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्काला अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्यांकडे पाहिले जात आहे.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये विविध राज्यांना प्रतिनिधित्व देताना संघटनात्मक अनुभव, राजकीय कौशल्य आणि विविध क्षेत्रातील नेतृत्वाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते. आगामी काळातील पक्षाचे संघटन विस्तार, जनसंपर्क आणि डिजिटल प्रचार यामध्ये या नव्या टीमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

थोडे नवीन जरा जुने