पत्रकार सुरेश वाणी यांना धमकीप्रकरणी पत्रकारांचा निषेध मोर्चा

Journalists' protest march over threats to journalist Suresh Vani.


जुन्नर, दि. १७ (रफिक शेख) : पत्रकार सुरेश वाणी यांना आमदार शरददादा सोनवणे यांनी धमकावल्या प्रकरणी जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील तसेच विविध प्रिंट मीडियाशी संबंधित पत्रकारांनी आज तहसीलदार कार्यालयाबाहेर निषेध मोर्चा काढला. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पत्रकारांनी जुन्नर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले.

पत्रकार वाणी यांना कथितरीत्या धमकी देण्यात आल्याने पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि पत्रकारांना धमकावण्याच्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निषेध मोर्चादरम्यान पत्रकारांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून आमदार शरददादा सोनवणे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली.

यावेळी जुन्नर-आंबेगाव परिसरातील विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि निर्भयपणे पत्रकारिता करण्याच्या अधिकाराचा प्रश्न उपस्थित करत या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पत्रकारांनी केली.

थोडे नवीन जरा जुने