चाकण - चाकण एमआयडीसी परिसरातील तब्बल २० कंपन्या आणि उद्योग वाहतूक कोंडी, खराब रस्ते, अपुरा वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. शासनाने केवळ घोषणा न करता तातडीने ठोस आणि कठोर निर्णय घ्यावेत. "कारखाने वाचवा, कामगार वाचवा" ही भूमिका स्वीकारून उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
नखाते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून चाकण एमआयडीसीतील अनेक कंपन्या आणि कारखाने इतर राज्यांमध्ये किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक उद्योजकांनी वाहतूक कोंडी, निकृष्ट रस्ते, अपुरा वीजपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे शासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उद्योगांना आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करण्यात शासन अपयशी ठरत असल्याने काही उद्योगांनी स्थलांतराचा पर्याय स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. ही बाब केवळ उद्योगांसाठीच नव्हे, तर हजारो कामगारांच्या रोजगारासाठीही धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
चाकण एमआयडीसी हे देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावर नावाजलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे औद्योगिक केंद्र आहे. या परिसरामुळे हजारो युवकांना रोजगार मिळाला असून पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात चाकणचा मोठा वाटा आहे. त्यामुळे हे औद्योगिक क्षेत्र टिकवणे ही शासनाची जबाबदारी आहे. उद्योगांचे स्थलांतर झाल्यास हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होईल, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीलाही धक्का बसेल, अशी चिंता नखाते यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी कामगारांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले. औद्योगिक विकासाबरोबरच कामगारांना किमान आणि समान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी, सुरक्षित कामाचे वातावरण आणि मूलभूत हक्क मिळणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग टिकले तरच रोजगार टिकेल आणि कामगारांचे भविष्य सुरक्षित राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शासनाने चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, उद्योगांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, कच्चामाल आणि तयार मालाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी तसेच उद्योगांना आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नखाते यांनी केली.
"चाकण एमआयडीसी वाचली तरच उद्योग, रोजगार आणि हजारो कामगारांचे भविष्य सुरक्षित राहील. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर कष्टकरी संघर्ष महासंघाच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशाराही काशिनाथ नखाते यांनी दिला.
