सेक्टर ११, १२ आणि १३ मधील वाढत्या चोरीच्या घटनांनंतर चिखली पोलिसांची कारवाई ; संशयितांवर कारवाई,पोलिस पेट्रोलिंगमध्ये वाढ
पिंपरी चिंचवड : चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड परिसरातील सेक्टर ११, १२ आणि १३ मधील विविध सोसायट्यांच्या परिसरात मागील काही दिवसांपासून अनोळखी व्यक्तींकडून कोयते व इतर हत्यारे घेऊन फिरण्याच्या तसेच चोरीच्या घटना निदर्शनास येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी चिखली पोलिस प्रशासनाकडे तातडीने तक्रार करून परिसरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली होती.
फेडरेशनच्या तक्रारीची दखल घेत चिखली पोलिसांनी परिसरात कारवाई सुरू केली आहे. पोलिस प्रशासनाने फेडरेशनला दिलेल्या पत्राद्वारे केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली आहे. पोलिसांनी दोन संशयित चोरट्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली असून त्यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, सोसायट्यांच्या परिसरात पोलिस पेट्रोलिंग वाढविण्यात आले असून संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सोसायटी परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
फेडरेशनच्या तक्रारीची तातडीने दखल
सेक्टर ११, १२ आणि १३ मधील सोसायट्यांमध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर फेडरेशनने पोलिस प्रशासनाकडे तातडीने तक्रार केली. सोसायटी परिसरात चोरी, संशयास्पद व्यक्तींची वर्दळ तसेच हत्यारे घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे फेडरेशनने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
फेडरेशनच्या पाठपुराव्यानंतर पोलिस प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाईला सुरुवात केली. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली असून परिसरातील पोलिस गस्तही वाढविण्यात आली आहे.
नागरिकांच्या सतर्कतेचे आवाहन
सोसायटी परिसरात अनोळखी व्यक्ती, संशयास्पद हालचाली किंवा चोरीचा प्रकार आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कारवाई न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सोसायट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे, सुरक्षा रक्षकांना सतर्क करणे आणि रात्रीच्या वेळी परिसरातील गस्तीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही फेडरेशनकडून सांगण्यात आले.
पोलिस प्रशासनाचे आभार
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत तातडीने कारवाई केल्याबद्दल चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी चिखली पोलिस स्टेशनचे अधिकारी व संपूर्ण पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. सोसायटी परिसरातील सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन आणि नागरिकांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘एकत्र राहूया... सुरक्षित राहूया... आपली सोसायटी, आपली जबाबदारी !’ या भूमिकेतून नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन फेडरेशनने केले आहे.संशयास्पद व्यक्ती किंवा घटना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या : १०० / ११२
प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांची, विशेषतः सोसायट्यांमधील माता-भगिनींची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. चिखली प्राधिकरणातील सेक्टर ११, १२ आणि १३ परिसरात मागील काही दिवसांपासून काही अज्ञात व्यक्ती हातामध्ये कोयते व इतर हत्यारे घेऊन फिरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या.
या गंभीर प्रकाराची दखल घेत आपल्या फेडरेशनने तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली होती.फेडरेशनच्या मागणीची दखल घेऊन चिखली पोलीस प्रशासनाने तत्काळ योग्य ती कारवाई केली. याबद्दल माननीय पोलीस आयुक्त तसेच चिखली पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.सोसायट्यांमधील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व सोसायटीधारकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी फेडरेशन यापुढेही प्रशासनाच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
– संजीवन सांगळे
अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन
