पिंपरी चिंचवड : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हृदयस्पर्शी उपक्रम चिंचवड परिसरात गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने राबविला जात आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच, महात्मा फुले नगर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदाही परिसरातील महिला भगिनी, विविध संस्था आणि साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘भारतीय जवानांसाठी आपली एक राखी’ या संकल्पनेतून परिसरातील प्रत्येक कुटुंबाने किमान एक ते पाच राख्या जवानांसाठी द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने राख्यांचे संकलन करण्यात आले. या राख्या केवळ बाजारातून आणलेल्या नसून अनेक ठिकाणी मंत्रजप, प्रार्थना आणि देशभक्तीच्या भावनेतून तयार करण्यात आल्या आहेत.
कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंचचे यशवंत कण्हेरे यांच्या पुढाकारातून सुमारे बारा वर्षांपूर्वी बाल संस्काराच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला लहान मुलांकडून महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचे पठण करून राख्या तयार करण्यात येत आणि त्या सीमेवरील जवानांना पोस्टाद्वारे पाठविण्यात येत. वर्षागणिक या उपक्रमाचा विस्तार होत असून, आज त्याला व्यापक सामाजिक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
यंदा ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ तसेच गायत्री परिवार, शांतीकुंज, हरिद्वार यांच्या सहकार्यानेही राख्या संकलित करण्यात आल्या. गायत्री मंत्राच्या जपाने संस्कारित केलेल्या या राख्या भारतीय सीमेवर तैनात जवानांसाठी पाठविण्यात आल्या. विशेष म्हणजे चिंचवड येथील पोस्ट कार्यालयातून या राख्या भारतीय सैन्याच्या सहा बटालियनकडे पाठविण्यात आल्या आहेत.
या उपक्रमाला सद्गुरु वामनराव पै यांच्या चिखली केंद्र पिंपरी-भोसरी शाखेतील महिला साधकांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. साप्ताहिक सत्संगाच्या वेळी विठ्ठल नामाचा जप करून राख्यांचे संकलन करण्यात आले. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे श्री गणेश मंदिर महात्मा फुले नगर येथे झालेल्या या उपक्रमात श्रीमती विद्युलता केदार यांची उपस्थिती होती.
जवानांना राखी पाठविणे म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या पारंपरिक नात्याचे प्रतीक नसून, ‘तुम्ही सीमेवर निर्धास्तपणे उभे रहा, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे,’ हा विश्वास आणि कृतज्ञतेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना त्यांच्या देशबांधवांकडून आलेली राखी निश्चितच भावनिक बळ, आत्मविश्वास आणि देशसेवेची प्रेरणा देणारी ठरते.
या नाजूक धाग्यातून चिंचवड परिसरातील नागरिकांनी देशरक्षण करणाऱ्या जवानांशी आपुलकीचे आणि कृतज्ञतेचे नाते जोडले आहे. धर्म, जात, पंथ आणि प्रादेशिक सीमांच्या पलीकडे जाऊन राष्ट्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करणारा हा उपक्रम समाजात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करणारा आहे.
या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांकडून कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंचचे यशवंत कण्हेरे तसेच सहभागी संस्था, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, साधक आणि सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.
राखीचा धागा छोटा असला, तरी त्यातून व्यक्त होणारी भावना विशाल आहे—‘जवानांनो, तुम्ही सीमेवर देशाचे रक्षण करता; आम्ही मात्र मनापासून तुमच्या पाठीशी आहोत!’
— वार्ताहर : शिवानंद चौगुले
महाराष्ट्र जनभूमी न्यूज, पुणे
