MGID Header Code
Code End

७७२ पदांची निर्मिती आणि निधीला मंजुरी; रुग्णसेवेला मोठा दिलासा


 जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप

- आमदार शंकर जगताप यांची जिल्हा रुग्णालय सक्षमीकरणाबाबत वचनपूर्ती

पिंपरी चिंचवड : जिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास मंत्रिमंडळाने (दि. ८)  मंजुरी दिली आहे. या रुग्णालयासाठी ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, पायाभूत सुविधा आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली. दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये ४०० खाटा वाढवण्यात याव्या अशी आग्रही मागणी आहे ,यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे . रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यासोबतच जिल्ह्यातील नागरिकांना माफक, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या निर्णयामुळे नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होऊन गंभीर आजारांवरील उपचार आता शहरातच उपलब्ध होणार असल्याचे आमदार जगताप यांनी नमूद केले.

 सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक नागरीकेंद्रित करण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत 'प्रगती' आरोग्य सुधारणा प्रकल्प राबविण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तब्बल ४ हजार २५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार आहे. यामधून जिल्हा रुग्णालयांना बळकटी मिळणार आहे. या प्रकल्पातून फक्त पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी जिल्हा आरोग्यसेवेला 'मल्टी स्पेशलिटी हब' म्हणून ओळख मिळावी . रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा वेळेवर आणि अचूक पद्धतीने मिळतील यावर भर दिला जाणार आहे. आरोग्य सेवेच्या उपलब्धतेचे बरोबर उपचारांचा खर्च नागरिकांच्या आवाक्यात रहावा यावरही या प्रकल्पातून भर दिला जाणार आहे.  प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि वेळेवर निदान झाल्यानंतर आजाराचे गांभीर्य वाढण्यापूर्वी त्यावर उपचार घेणे यामुळे रुग्णांना शक्य होईल. या माध्यमातून राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये आधुनिक यंत्रसामग्री, डिजिटल आरोग्य सुविधा आणि दर्जेदार उपचार व्यवस्था उभारण्यावर भर दिला जाणार आहे.

 ---------------------------------------

गंभीर आजारांवरील उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत

दरम्यान राज्य मंत्रीमंडळाने प्रगती प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी २०० खाटांचे सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. तसेच कोल्हापूर आणि नांदेड येथे ५०० खाटांची, नागपूर आणि लातूर येथे ३०० खाटांची जिल्हा रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. या पाच रुग्णालयांसाठी एकूण २ हजार ४३० पदे निर्माण करण्याचे ही मंजुरी देण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी आमदार शंकर जगताप यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. याच अंतर्गत  (दि. ८)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा रुग्णालयाचे  सुपरस्पेशालिटी आरोग्य केंद्रात रूपांतर करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नवीन सुपरस्पेशालिटी सुविधेमुळे हृदयरोग, कर्करोग, मेंदू व मज्जासंस्थेचे आजार, मूत्रपिंडविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयांत अथवा उपचारांसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार असून, जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम, आधुनिक आणि रुग्णाभिमुख होणार असल्याचे  आमदार शंकर जगताप म्हणाले.

  --------------------------------

“जिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी हा सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी  फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा रुग्णालय आधुनिक, सक्षम आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण 'सुपरस्पेशालिटी '  केंद्र म्हणून विकसित होत आहे. पदनिर्मिती, निधी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, तो निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी पुढेही प्रयत्नशील राहणार आहे."

- शंकर जगताप
आमदार चिंचवड विधानसभा मतदारसंघ 



थोडे नवीन जरा जुने