प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या बसमालकांवर विशेष लक्ष; तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी
पुणे (वर्षा चव्हाण) : दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन खासगी प्रवासी बसकडून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या बसमालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या भाडे मर्यादेचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायदा, १९८८ आणि संबंधित नियमांनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे. तसेच, प्रवाशांनी जादा भाडे आकारणी किंवा अन्य नियमभंग आढळल्यास तक्रार नोंदवावी, असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी तसेच पर्यटनासाठी प्रवास करतात. या काळात खासगी प्रवासी बसची मागणी वाढते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही बसमालकांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खबरदारी घेतली असून, खासगी बसमालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
बसमालक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक
या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात खासगी बसमालक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रवाशांकडून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारले जाऊ नये, प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये आणि सणासुदीच्या काळात रस्ते सुरक्षा नियमांचे पालन व्हावे, याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, परिविक्षाधीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल फसले, परिविक्षाधीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित आर्सुळ यांच्यासह बसमालक संघटनेचे २६ प्रतिनिधी उपस्थित होते.
निर्धारित भाडे मर्यादेचे पालन बंधनकारक
शासनाच्या २० एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार खासगी प्रवासी बसमालकांना निर्धारित भाडे मर्यादेतच प्रवासी भाडे आकारणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारणाऱ्या बसमालकांविरुद्ध दिवाळीच्या कालावधीत विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे बसमालकांनी शासनाने निश्चित केलेल्या भाडे मर्यादेचे पालन करावे आणि प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने अतिरिक्त पैसे आकारू नयेत, असे निर्देश परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत.
सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन
जादा भाडे आकारणी रोखण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही परिवहन विभागाने प्राधान्य दिले आहे. बसचालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, प्रवासी बसची आवश्यक कागदपत्रे वैध स्थितीत असणे बंधनकारक आहे. दिवाळीच्या गर्दीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बसमालक आणि चालकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
जादा भाडे आकारल्यास येथे करा तक्रार
खासगी बसमालकाकडून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्यास किंवा अन्य नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास प्रवाशांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.
तक्रारीसाठी परिवहन कार्यालयाने ८२७५३३०२०९ हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार करताना प्रवाशांनी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि तिकिटाचा छायाचित्रासह तपशील पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि नियमांनुसार प्रवास करता यावा, तसेच जादा भाडे आकारणीमुळे होणारी आर्थिक पिळवणूक रोखता यावी, यासाठी परिवहन विभागाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे प्रवाशांनी जादा भाडे आकारणी सहन न करता संबंधित यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
