वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांचे मार्गदर्शन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदीतील एमआयटी वाणिज्य व शास्त्र कनिष्ठ महाविद्यालयात आज दहशतवाद, सायबर व रस्ते सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव कुंभार यांनी केले. रस्ते सुरक्षा विषयक नियम आणि सद्यस्थितीवर पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे म्हणजे त्यांना स्वतःला देखील सुरक्षितता अनुभवता येईल आणि पालकांना देखील मनस्ताप सहन करावा लागणार नाही असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले.
यावेळी सायबर सुरक्षा व दहशतवाद या विषयावर बोलताना आळंदी, दिघी वाहतूक विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्या पासून आता पर्यंतच्या सर्व वाटचालीचा आणि देशापुढील आव्हानांचा आढावा घेतला. देशावर झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यां विषयी सविस्तर माहिती सह सर्व घटनांचा आढावा घेत दहशतवादाच्या विविध प्रकारांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
देशातील प्रत्येक नागरिकांनी दहशतवादाबद्दल सजग राहिले पाहिजे. जर काही अनुचित प्रकार आढळला तर लगेच सुरक्षा व्यवस्थांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अत्यंत चाणाक्षपणे समाजात सर्वत्र लक्ष ठेवून समाजाला व देशाला हानिकारक गोष्टींपासून वाचवले पाहिजे असे प्रतिपादन विनोद पाटील यांनी केले.
तरुण पिढीने व विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे आणि अवांतर वाचन वाढविले पाहिजे. स्वतःचा विकास करून घेतला पाहिजे. आपल्या बरोबर समाजाच्या विकासात देखील भर घातली पाहिजे असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ओंकार इनामदार उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. श्रीकांत आचोले यांनी मानले.

