MGID Header Code
Code End

शिक्षणाच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी सावरकर मंडळाचा स्तुत्य उपक्रम

 


११२ विद्यार्थ्यांना चार लाख रुपयांचे शैक्षणिक सहाय्य; डॉ. अभय कुलकर्णी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

निगडी | वार्ताहर : शिवानंद चौगुले, महाराष्ट्र जनभूमी न्यूज

निगडी : आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण सहाय्य योजना २०२६’ या उपक्रमाच्या पाचव्या वर्षातील निधी वितरण कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मंडळाच्या कॅप्टन कदम सभागृहात करण्यात आले. यावेळी सहा शाळांमधील ११० विद्यार्थी आणि दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकूण चार लाख रुपयांचे शैक्षणिक सहाय्य वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. मंडळाच्या महिला विभाग कार्यकारिणी सदस्य डॉ. संगीता रानडे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यकारिणी सदस्य डॉ. अजित जगताप यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

शिक्षणासाठी मिळालेल्या मदतीचा सदुपयोग करा : डॉ. अभय कुलकर्णी

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते, आयआयसीएमआर (IICMR), निगडीचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, ध्येय निश्चिती, मेहनत आणि जीवनातील संधी यांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षण घेताना शालेय शुल्काअभावी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, या उदात्त हेतूने राबविण्यात येणाऱ्या शिक्षण सहाय्य योजनेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी मिळालेल्या आर्थिक मदतीचा योग्य उपयोग करून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे. त्यासाठी सातत्याने मेहनत करण्याची तयारी ठेवावी. स्वतःची क्षमता, कमकुवत बाजू आणि भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संधी यांचा विचार करून ध्येय निश्चित करावे आणि स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी स्वतःला तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोणतेही काम लहान किंवा कमी दर्जाचे नसते, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांनी जपानमधील रेल्वे स्वच्छतेच्या व्यवस्थापनावर आधारित एक लघुपट दाखविला. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना समर्पक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

स्वतःच्या शैक्षणिक जीवनातील अनुभव सांगताना त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना स्वतःची पुस्तके विकत न घेता ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग करून यश संपादन केल्याचे नमूद केले. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, मेहनत आणि जिद्द यांच्या बळावर यश मिळविता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आज समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांनीही सक्षम झाल्यानंतर आर्थिक अडचणींमुळे कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पुढाकार घ्यावा. अशा प्रकारे मदतीची ज्योत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रज्वलित ठेवावी, असे भावनिक आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले.

दानशूर व्यक्तींच्या सहकार्याचे आवाहन

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मंडळाच्या सचिव ॲड. हर्षदा पोरे आणि कोषाध्यक्ष विकास देशपांडे यांनी केले. निधी वितरण कार्यक्रमाचे संचालन तसेच या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे आभार विकास देशपांडे यांनी मानले.

शिक्षण सहाय्य योजनेचा उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू राहण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, कार्यकारिणी सदस्य शैलेश भिडे, विनायक पोळ आणि प्रशांत पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथपाल नीता जाधव यांनी शालेय शिक्षकांशी योग्य समन्वय साधला. सुजीत गोरे, स्नेहल पानसे, कमल खांबे, अनघा देशपांडे, वैशाली आम्ले आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

शिक्षणाला आर्थिक मदतीचा आधार आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा देणारा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण ठरला.महाराष्ट्र जनभूमी न्यूज | शिवानंद चौगुले

थोडे नवीन जरा जुने