MGID Header Code
Code End

ढोल-ताशा महासंघातर्फे दगडुशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचा सन्मान!


- कसबा गणपती मंदिरात सत्कार सोहळा

- हिंदुभूषण ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान, गणेशभक्तीचा वारसा आणि ढोल-ताशा वादनाची सामूहिक ताकद अधोरेखित करणाऱ्या ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्राच्या वतीने ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेश सूर्यवंशी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांना श्री गणेशाच्या महाआरतीसाठी सस्नेह निमंत्रित करण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ स्मारकस्थळी ४११२ ढोलवादकांच्या सहभागातून साकारलेल्या विश्वविक्रमी ढोलवादनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ढोल-ताशांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक व्यापक करण्याबरोबरच पारंपरिक कलांचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेश सूर्यवंशी, ट्रस्टचे कोषाध्यक्ष तथा माजी अध्यक्ष सुनील रासने, पत्रकार आनंद सराफ, कुमार रेणुसे, तुळशीबाग गणेशोत्सवाचे कोषाध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पंडित आणि कसबा गणपती देवस्थानचे अध्यक्ष विनायक ठकार गुरुजी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक जतन आणि लोकसहभागाचे प्रभावी माध्यम आहे. ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध संघटना आणि कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांचा सन्मान आणि मान्यवरांचा सहभाग यामुळे गणेशोत्सवाची परंपरा व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश अधिक दृढ झाला.

हिंदूभूषण ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वतीने हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे सदस्य प्रताप मोहिते, सामाजिक कार्यकर्ते रवीभाऊ गायकवाड, ट्रस्टचे सदस्य इंद्रजित भोसले, प्रसाद वायकर, समन्वयक गणेश गुरव आदी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. विश्वविक्रमी ढोलवादनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला नवी उंची देणाऱ्या या उपक्रमाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी  ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्राचे संघटक अनुप साठे, महासंघाचे सदस्य विलास शिगवण, पिंपरी-चिंचवड ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष विशाल मानकर, पुणे शहर ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष अक्षय बलकवडे, कार्याध्यक्ष अभिजीत कुमावत, सचिव प्रशांत तांबे, खजिनदार मंदार गोसावी, उपाध्यक्ष प्रकाश राऊत आणि वरिष्ठ उपाध्यक्ष रवी बोडके यांचीही यावेळी उपस्थिती होती.

थोडे नवीन जरा जुने