कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्त्यांसह नागरिकांच्या अनेक गंभीर समस्या कायम असताना महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी हे नऊ दिवसांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर गेल्याने कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी “शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर,” अशा शब्दांत टीका केली आहे.
दक्षिण कोरियातील साउथ सेल येथे ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या परिषदेत डिजिटल वॉटर एक्सलेटर प्रोग्रॅमसाठी आयुक्त सहभागी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असताना पाण्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नखाते यांनी म्हटले. शहरातील नागरिकांच्या महत्त्वाच्या कामासाठी भेटण्यासाठी आयुक्तांनी मंगळवार आणि गुरुवार हे भेटीचे दिवस निश्चित केले आहेत; मात्र या दिवशीही आयुक्त नागरिकांना भेटत नसल्याने आपल्या समस्या मांडण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. आयुक्त शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी भेटत नसताना अशा परिस्थितीत परदेश दौरा कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शहरातील कचरा प्रश्नावरही नखाते यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. महापालिकेच्या दहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्यास अनेकांकडून विरोध होत असतानाच शहरातील विविध भागांत कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे. प्रत्यक्षात शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सफाई कामगार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे नखाते यांनी नमूद केले.
शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अपघातांची समस्या आणि महापालिका रुग्णालयांमधील उपचार व सुविधांशी संबंधित अडचणी याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना प्रशासनाने या प्रश्नांना प्राधान्य देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त विजय सूर्यवंशी हे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून सामान्य नागरिक, गरीब, कष्टकरी, कामगार , गृहप्रकल्प लाभार्थी आणि हॉकर्स यांच्या प्रश्नांबाबत आयुक्त असंवेदनशील असल्याची भावना निर्माण झाली आहे. शहराच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना प्रशासनातील प्रमुख अधिकारी परदेश दौऱ्यावर असणे नागरिकांच्या दृष्टीने चिंतेचे आहे. तसेच आयुक्तांनी कोरिया दौऱ्यावरून परतताना शहरातील पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी काही ठोस योजना आणि शहराच्या हिताचे नावलौकिकाचे एखादे गिफ्ट घेऊन यावे, असेही काशिनाथ नखाते यांनी म्हटले.
